जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२३ । मुलीचे लग्न म्हणजे बापासाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. परंतु जामनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक येथे एका लग्न सोहळ्यातील आनंदावर विरजण पडलं आहे. हळदीच्या कार्यक्रमात नाचत असताना नवरीच्या वडिलांचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यापूर्वीच बापाने जगाचा निरोप घेतला. अरुण कासम तडवी (वय ५०, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असं मृत पित्याचं नाव असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी काय आहे घटना?
जामनेर तालुक्यातील मांडवे खु. येथील रहिवाशी अरुण तडवी यांची दुसरी मुलगी हिना हिच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. शनिवारी हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रमानंतर हिना हिचाही गावात बीदचा कार्यक्रम सुरु होता. या बीद कार्यक्रमात नाचत असताना अरुण तडवी यांना हृदयविकाराचा झटका आला. तडवी यांना तातडीने तोंडापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत अरुण तडवी यांची प्राणज्योत मालवली होती.
मुलीपासून वडिलांच्या मृत्यूची बाब लपवली?
आनंदाच्या क्षणामध्ये बाप कुठे दिसत नसल्याने हिनाला शंका आली. तिचे वडील अरुण तडवी यांचा मृत्यू झाल्याची बाब तिच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती. बापाच्या प्रतिक्षेत हिना हिने कशीबशी रात्र काढली. मात्र रात्र उलटूनही दुसऱ्या दिवशी बाप दिसत नव्हता. तिने अनेकांना विचारपूस केली, मात्र सर्वांकडून तिची समजूत काढली जात होती. सकाळी ७ वाजेच्या सुमारास तिचं लग्न लागले. लग्नसोहळा उरकल्यानंतर सर्वांनी अक्षदा टाकल्या मात्र बाप दिसला नसल्याने हिना कासावीस झाली.
अखेर तिला खरं काय ते सांगण्यात आले. बापाच्या मृत्यूची बातमी ऐकताच हिनाने हंबरडा फोडला. हिनाचा आक्रोश बघून लग्न सोहळ्याला उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते. ज्या ठिकाणी मुलीच्या लग्न सोहळा आटोपला, त्यानंतर काही तासातच त्याच ठिकाणी बापाची अंत्ययात्रा निघाली. या घटनेने सर्व गाव सुन्न झाले होते. मयत अरुण तडवी यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे.