जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२५ । भुसावळ तालुक्यातील किन्ही वेल्हाळे शिवारात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये बापासह सात वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. संजय श्रावण साबळे (वय ४० रा. सिद्धेश्वर नगर, वरणगाव) असं मृत बापाचे नाव असून भूषण संजय साबळे (वय ७) असं मृत मुलाचं नाव आहे. ही घटना आज २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेनं परिसरात सिद्धेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे घटना?

वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरमध्ये वास्तव्यास असलेले संजय साबळे हे ट्रॅक्टरने किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर ‘कच’ आणण्यासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा ७ वर्षांचा मुलगा भूषण आणि अक्षय संतोष मोरे (वय २४) हा मजूर देखील होता. प्रवास सुरू असताना अचानक ट्रॅक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच उलटला.

यावेळी ट्रॅक्टरखाली दाबले गेल्याने चालक संजय साबळे आणि त्यांचा मुलगा भूषण या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर मजूर अक्षय मोरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्यासोबत मुलाचाही मृत्यू झाल्याने साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावळी वरणगाव ग्रामीण रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली आणि कुटुंबांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.








