बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

चोरटे झाले सैराट : शेतकऱ्याची दुचाकीसह मोबाईल, रोकड लांबविली

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांना पोलिसांचा धाकच शिल्लक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता जळगाव तालुक्यातील पिलखेडा शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्याने शेतकऱ्याची दुचाकीसह मोबाईल, रोकड लांबविली. याबाबत जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पिलखेडा येथील राजेंद्र सोमनाथ भालेराव (वय-४७) यांचे पिलखेडा शिवारातील शेत गट क्रमांक-६२ येथील शेतात पोल्ट्री फार्म आहे. या ठिकाणी १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेच्या दरम्यान राजेंद्र भालेराव पोल्ट्री फार्मच्या बाहेर झोपलेले होते.

त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची (एमएच १९ बीडब्ल्यू १४६२) क्रमांक असलेली दुचाकीसह मोबाईल आणि ११ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर राजेंद्र भालेराव यांनी जळगाव तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील करीत आहे.