जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२५ । गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांसह जनावरे, घरांचं मोठं नुकसान झाले. अशातच आता पाचोऱ्याला मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढलं आहे. पाचोरा शहरासह तालुक्यात मध्यरात्री आणि आज सकाळी पुन्हा जोरदार पाऊस झाला असून यामुळे नदी नाल्यांना पूर आला. पुरामुळे शेती पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान वरखेडीच्या एक शेतकऱ्याचा शेतातून घरी परत येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. सतीश मोहन चौधरी (३५) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

सतीश चौधरी हे वरखेडी येथील रहिवाशी असून ते शेती सांभाळून पोस्टात टपाल वितरणाचे काम करत होते. दरम्यान मध्यरात्रीपासून पाचोरा शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नद्यांना पूर आला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेताजवळून वाहणाऱ्या नाल्यामुळे काही नुकसान झाले आहे का, हे पाहण्यासाठी सतीश चौधरी आज सोमवारी सकाळी शेतात गेले होते.

दरम्यान, शेतात पोहोचत नाही तितक्यात पुन्हा जोरात पाऊस सुरू झाल्याने ते एका झाडाखाली काही वेळ थांबले. पाऊस थोडा कमी झाल्यावर सांगवी गावाच्या रस्त्यावरून वरखेडीकडे येण्यास निघाले. मात्र, सांगवी ते वरखेडी दरम्यानच्या नाल्यास अचानक मोठा पूर आल्याने ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. ग्रामस्थांना वरखेडी बाजारपेठेतील शनी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.

आधीच गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालं असताना आता पुन्हा पावसाने झोडपून काढलं. यामुळे काढणीवर आलेलं पीकही हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान जोरदार पावसामूळे पाचोरा शहरातील कृष्णापुरी आणि पांचाळेश्वराच्या जवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने पाचोरा शहर ते कृष्णापुरी दरम्यानचा रस्ता बंद झाला. हिवरा नदीच्या काठावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरले.









