⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | फडणवीसांचा ‘पीडी’ आणि खडसेंची ‘सीडी’ व्हाया गिरीश महाजन!

फडणवीसांचा ‘पीडी’ आणि खडसेंची ‘सीडी’ व्हाया गिरीश महाजन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा आज नव्हे तर कायमच हॉट राहिला आहे. तापमान असो कि राजकीय आखाडा, घोटाळे असो कि कोरोना.. जळगावने कायमच बाजी मारली आहे. चर्चेत राहणारे जळगाव पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर गाजत आहे. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांनी विकासावर लक्ष देण्यापेक्षा एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करण्यात धन्यता मानली. महाजन-खडसे वादात काही महिन्यांपासून एक सीडी चर्चेत होती. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी ‘तुम्ही ईडी लावली तर आम्ही सीडी लावू’ असे वक्तव्य केले होते. खडसेंची सीडी तर आली नाही मात्र माजी मंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ‘पीडी’ मात्र येऊन गेला. ‘पीडी’ देखील गिरीश महाजन यांच्याशी संबंधितच आहे. सीडी आणि पीडीच्या चर्चेने जळगाव विकासात नव्हे मात्र बदनामी पुन्हा आघाडीवर आले आहे. राजकारणात केव्हा काय होईल हे कधीच सांगता येऊ शकत नाही. फडणवीसांच्या ‘पीडी’ने गिरीश महाजनांसह भाजप पुन्हा जोरदारपणे सक्रिय झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात आजवर अनेक दिग्गज नेते होऊन गेले मात्र एकमेकांचे पाय खेचण्यात जळगावचा विकास मात्र रखडला. जळगाव शहरात अनेक वर्ष सुरेशदादा जैन यांची सत्ता होती. राज्यात ते आणि एकनाथराव खडसे दोन्ही पावरफुल्ल नेते होते. दोघांच्या वादात जळगाव दुर्लक्षित राहिले. जिल्ह्याचे दुर्दैव असे कि राज्यात असलेल्या सत्तेच्या विरोधातच बहुतांशी सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेत पाहायला मिळाल्या. त्याचमुळे कि काय राज्यातील सत्तेचा जिल्ह्याला हवा तसा लाभ घेता आला नाही. विकास रखडला असला तरीही जिल्हा चर्चेतच राहिला. सेक्स स्कँडल, घरकुल घोटाळा, सिमी संघटन याच्यासह राजकीय चिखलफेकीने जळगाव कायमच बरबटलेले आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने जेष्ठ नेते असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यात असलेले वैर सुपरिचित आहे. एकाच पक्षात असताना देखील दोन्ही नेते एकमेकांची खिल्ली उडवण्याची संधीची सोडत नव्हते. दोघांच्या जोडीला जोड देत मधूनच विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे टुमकी सोडायचे. मोठ्या नेत्यांचे वक्तव्य असल्याने राज्याचे लक्ष लगेच जळगावकडे केंद्रित होते. एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी प्रकरण, दाऊदशी संबंध असे आरोप करण्यात आले तर गिरीश महाजन यांच्यावर जागा बळकावली, दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात हजेरी, जामनेर शॉपींग कॉम्पलेक्स, शैक्षणिक मालमत्ता हडप करण्याचे त्यांच्यावर झाले होते. राज्याचे नेते असल्याने जळगाव नेहमी बदनाम झाले.

एकनाथराव खडसे भाजपातून बाहेर पडल्यावर दोन्ही नेत्यांमधील वितुष्ठ अधिकच वाढले. राष्ट्रवादी पक्षप्रवेशालाच एकनाथराव खडसेंनी ‘तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेल’ असा घणाघात केला होता. खडसे परिवाराच्या मागे ईडी लागली. जावई कारागृहात गेले, पत्नीला ईडीने नोटीस बजावली तरीही खडसे शांतच राहिले. सीडी काही बाहेर आली नाही. खडसे-महाजन वाद सुरु असताना मध्येच मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत देखील खडसेंचे शाब्दिक युद्ध सुरु झाले. कोण, कुणाची जिरवणार यातच दररोज टोलेबाजी सुरु होती. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ‘पीडी’ बॉम्ब टाकला.

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना हाताशी धरत महविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन आणि मला अडकविण्यासाठी कसा डाव रचला याचा तब्बल सव्वाशे तासांचा व्हिडीओच त्यांनी समोर आणला. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेते, शासकीय अधिकारी यांच्या नावाचा उल्लेख असलेले व्हिडीओ, रेकॉर्डिंग फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना दिल्या. ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याच्या हवेत असलेल्या महविकास आणि विशेषतः राष्ट्रवादीचा भाजपनेच करेक्ट कार्यक्रम लावला. एकनाथराव खडसे सीडी देणार, सीडी दाखविणार अशी आशा लावून असलेल्या समर्थकांना आपल्या नेत्यांच्या विरोधातील पुरावे काही तासात मोबाईलवर मिळाले.

राज्यभरातील सर्वच सोशल मीडिया ग्रुप, माध्यमात ते सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डिंग, महविकास आघाडीचा कत्तलखाना अशा आशयाची पीडीएफ फाईल व्हायरल होत आहे. प्रत्येकाच्या तोंडावर तोच विषय असून खडसे आणि मविप्रतील पाटील गटाच्या संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले आहे. माझे नाव तर नाही अशा भीतीने अनेकांनी देव पाण्यात टाकले असावे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे झालेले डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय खेळी खेळतात, एकनाथराव खडसे यावर काय बोलणार? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित असले तरी भाजप जोमात कामाला लागली आहे. काहीही झाले तरी आपली सत्ता प्रस्थापितच करायची असा विडाच त्यांनी घेतला आहे.

गिरीश महाजन हे भाजप आणि महाविकास आघाडी दोघांच्या केंद्रस्थानी राहिले आहे. बीएचआर प्रकरणात महाजन गटाच्या लोकांची झालेली धरपकड, अपहरण प्रकरणी दाखल झालेला गुन्हा, मविप्र, शॉपींग कॉम्पलेक्स खरेदी आरोप हे सर्व अलीकडच्या काळातील घडामोडी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात टाकलेला पीडी बॉम्ब हा महाजनांना वाचविणारा तसेच राष्ट्रवादीच्या विरोधातील आहे. गिरीश महाजन यांच्यामुळे ही खेळी खेळण्यात आली असल्याचे समोर येत असले तरी यामागे मोठे राजकारण शिजतेय हे मात्र निश्चित आहे. भाजप समर्थक ज्या प्रकारे एकाच दिवसात फुल्ल चार्ज झाले ते लक्षात घेता येणार काळ काहीतरी मोठे चित्र दाखवेल हे मात्र निश्चित.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.