पाळधी येथे २७५ रुग्णांची नेत्र तपासणी; ८० जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंतांना आधार

जळगाव लाईव्ह न्यूज । वाढदिवस केवळ जल्लोषासाठी नाही, तर समाजासाठी असतो,” हे दाखवून देत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र आणि तरुण उद्योजक विक्रम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल व GPS फाउंडेशन यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, शुगर व बीपी तपासणी शिबिरासह विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या शिबिरात २७५ गरजू रुग्णांची नेत्र तपासणी झाली, तर ८० रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील आय शंकरा हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले.
सेवा हाच संस्कार – शिवसेनेची ओळख
शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. चंदन चौधरी, डॉ. गणेश करपे, डॉ. राहुल चौधरी, डॉ. ऋषीकेश झंवर यांनी तपासणी करून रुग्णांना आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले. रुग्णांच्या येण्या – जाण्याच्या तसेच जेवणाच्या सर्व व्यवस्था GPS फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्या.
तरुणाईचा जोश – शिवसेनेचा जल्लोष !
सायंकाळी शिवसेना आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात केक कापून विक्रम पाटील यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस हा केवळ सेलिब्रेशनसाठी नसून समाजासाठी संकल्प घेण्याची संधी असते, हे दाखवून देत गुलाबराव पाटील कुटुंबाने शिवसेनेची परंपरा कायम ठेवली, हृदयात जनसेवा कृतीत विकास आणि हातात भगवा हिच गुलाबभाऊंची ओळख आहे असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.