जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । पोलीस प्रशासनात कोणत्याही गुन्ह्यात किंवा इतर प्रकरणात बऱ्याचदा कायदेशीर बाजू समजून घेणे पोलिसांसाठी जिकरीचे होत असते. कायद्याचे संपूर्ण न्यायालयीन ज्ञान नसल्याने पोलिसांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. पोलिसांचे काम सुकर व्हावे आणि गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी एका विधी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. नाशिक पोलीस परिक्षेत्र विभागातील जिल्हा विधी अधिकाऱ्याच्या सर्वच्या सर्व जागा गेल्या दोन वर्षापासून रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस प्रशासनामध्ये पोलिसांना दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांना सामोरे जावे लागते. एखादा गुन्हा कोणत्या कलमा अंतर्गत मोडतो आणि त्याचे स्वरूप किती गंभीर आहे हे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळत नाही. गुन्हा दाखल करताना अनेक अडचणी पोलिसांसमोर निर्माण होत असतात अशावेळी पोलिसांना कायदेशीर सल्ला आवश्यक असतो. बऱ्याचदा पोलिसांवर देखील आरोप केले जातात किंवा पोलिसांची चौकशी सुरू होते अशा प्रकरणात देखील पोलिसांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विधी अधिकारी आवश्यक असतात. पोलिसांच्या अडचणी कमी व्हाव्या आणि योग्य कायदेशीर सल्ला मिळावा यासाठी पोलीस प्रशासनात जिल्हास्तरावर एक तसेच प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एक विधी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते.
विधी अधिकाऱ्याची नेमणूक करताना रीतसर जाहिरात काढून अर्ज मागविले जातात. एका विधी अधिकाऱ्याला साधारणत २५ ते ३० हजार रुपये मासिक मानधन आणि इतर भत्ते ५ ते ८ हजार रुपये देया असतात. ११ महिन्यांच्या करार पद्धतीने ही निवड करण्यात येते. तसेच तीन वर्षापर्यंत या नेमणुकीला मुदत वाढ दिली जाते. पोलीस प्रशासनाकडून नेमला जाणारा विधी अधिकारी हा पोलिसांना कार्यालयीन वेळेससह कधीही कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सहकार्य करतो. पूर्णवेळ विधी अधिकारी असल्याने पोलिसांना देखील हक्काचा एक अधिकारी भेटत असतो.
पोलीस विभागात सध्या विधी अधिकारी नसल्याने कोणतेही कायदेशीर काम करताना किंवा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी पोलिसांना बाहेरील विधी अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. पोलीस प्रशासनाकडून बाहेरील विधी अधिकाऱ्यांना एका वेळेसाठी १५०० ते ३ हजार रुपये मानधन दिले जाते. मध्यंतरी कोरोना काळ आणि नंतर पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार विधी अधिकाऱ्यांची नेमणूक प्रक्रिया रखडली असल्याचे समजते. विधी अधिकारी पद कायमस्वरूपी भरती करण्याची मागणी देखील मध्यंतरी झाली होती, त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा देखील करण्यात आला होता. विधी अधिकारी पदाच्या भरतीचे कार्य पोलीस महानिरीक्षक, नाशिक यांच्या अंतर्गत येते.
नाशिक परिक्षेत्रात विधी अधिकारी पदाची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पुढील पंधरा दिवसात त्या संदर्भातील जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी जळगाव लाईव्ह सोबत बोलताना सांगितले.
विधी अधिकारी पदाच्या भरतीची प्रक्रिया नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लवकरच हि प्रक्रिया सुरु होणार असून त्यासंदर्भातील पाठपुरावा जळगाव कार्यालयाकडून करण्यात आला होता, असे जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले.