जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवार दिनांक १० जून पासून सुरु होत आहे, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयदेखील परीक्षेचे केंद्र असून परीक्षा १० ते २३ जून दरम्यान दोन सत्रांमध्ये होणार आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बुधवारी ९ रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा झाली.
कार्यशाळेत केंद्रीय निरीक्षक डॉ.एस.एस. मडावी, केंद्र प्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, अंतर्गत भरारी पथक प्रमुख डॉ भारत घोडके प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीच्या प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षांबाबत माहिती देण्यात आली.
जळगावच्या महाविद्यालयात चार कक्षांमध्ये हि परीक्षा घेण्यात येणार असून शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत पीपीटी द्वारा परीक्षा प्रणाली कशी पार पडेल याची माहिती निरीक्षकांनी दिली. कक्षामधील बैठक व्यवस्था, कोरोना प्रतिबंधनाचे नियम पाळून करण्यात आले असून विद्यार्थ्यांचे आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल पाहून प्रवेश दिला जाणारा आहे.
अशी होणार परीक्षा
परीक्षा सकाळी १० ते १ आणि दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रांमध्ये होणार आहे. संभाव्य गैरप्रकारांवर सीसीटीव्ही व भरारी पथकाद्वारे कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. कार्यशाळेत, परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यावेळी पर्यवेक्षकांना परीक्षेवेळी दक्ष राहण्याच्या सूचना अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद यांनी दिल्या. यावेळी वरिष्ठ परिवेक्षक डॉ योगिता सुलक्षणे, डॉ मोनिका युनाती, डॉ चेतन भंगाळे, डॉ गिरीश राणे, डॉ गणेश लोखंडे, प्रदीप जैस्वाल, किरण बावस्कर, विशाल दळवी आदी उपस्थित होते.