⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

एकनाथ शिंदेंची नेमकी संपत्ती किती? आकडेवारी आली समोर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. आता त्यांच्या गटात अपक्ष आणि शिवसेना असे मिळून 50 आमदार असल्याचा दावा स्वतः शिंदे यांनीच केला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलेली आहे. परंतु या सगळ्या चर्चेत विषय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती आहे याची आकडेवारी समोर आली आहे.

2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. यामध्ये एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं दिलं गेलं. 2019 साली दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली होती. यामध्ये त्यांनी घर, गाडी, मालमत्ता, सोनं, गुंतवणूक, कर्जासह इतर माहिती जाहीर केली होती. मात्र, 2019 पर्यंत नेमकी त्यांची संपत्ती किती होती, याची आकडेवारी समोर आली आहे.

खरंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांचा राजकीय प्रवास हा मोठा संघर्षाचा होता. रिक्षाचालक ते आता बंडखोर शिवसैनिक असा हा प्रवास झालाय. आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या मालमत्तेबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

2019मध्ये एकनाथ शिदे यांच्याकडे एकूण सात गाड्या होत्या. या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत 46 लाख रुपये इतकी होती. यात स्कॉर्पिओ, बोलेरो, इनोव्हा, अरमाडा, टेम्पो या गाड्यांचा समावेश होता. प्रत्येकी दोन स्कॉर्पिओ आणि इनोव्हा तर प्रत्येकी एक बोलेरो, आरमाडा आणि टेम्पो एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. याशिवाय एक पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हरही आपल्याकडे असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28 लाख रुपयांची शेतजमीन आहे. हे जमीनमूल्य 2019 च्या बाजारभावाप्रमाणे लावण्यात आलेलं आहे. यात आता काही प्रमाणात वाढ झालेली असू शकते. महाबळेश्वरमध्ये एकनाथ शिंदे यांची 12 एकर जमीन आहे. याशिवाय चिखलगाव, ठाण्यात पत्नीच्या नावे 1.26 हेक्टर जमीन असल्याचीही माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रातून दिलेली.

वागळे इस्टेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावावर 30 लाखांचा एक दुकानाचा गाळा आहे. तर ठाणे पश्चिमेच्या वागळे इस्टेटमधील धोत्रे चाळीत एक घर आहे. हे घर 360 स्केअर फिट आहे. तर लँडमार्क को ऑप. हौसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान फ्लॅटही आहे. या फ्लॅटचं क्षेत्रफळ 2370 स्केअर फिट आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पत्नीच्या नावेही असाच एक फ्लॅट याच सोसायटीमध्ये आहे. तर शिवशक्ती भवन इथेही एक फ्लॅट पत्नीच्या नावे घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. घरं आणि गाळ्याांचा आताचं मूल्य 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकनाथ शिंदे यांच्यावर 3 कोटी 74 लाख रुपयांचं कर्ज होतं. आता गेल्या अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत नेमकी किती वाढ झाली, हे कळू शकलेलं नाही.