गोळीबारातील जखमी चाळीसगावच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले चाळीसगावचे भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र (बाळू ) भगवान मोरे (६०) यांचा नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.
चाळीसगावात बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजता एका कारमधून आलेल्या अज्ञातांनी महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांना तीन ते चार गोळ्या लागल्या होत्या. मोरे यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले गेले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना नाशिक येथे नेण्यात आले होते.
तिथे त्यांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी हल्ला करणारे पाच आणि कट रचणारे दोन अशा सात जणांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोरे यांच्यावर आज शनिवारी दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी व ३ मुले असा परिवार आहे.