.. अन्यथा अन्न व्यवसाय करणाऱ्यांवर होणार 10 लाखांपर्यंतचा दंड
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । अन्न सुरक्षा व मानके कायदयाअंतर्गत अन्न व्यवसाय करणा-या आस्थापनांना अन्न परवाना/नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्हयातील अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी घेवूनच अन्न विक्रीचा व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायदयानुसार गुन्हा असून असे केल्यास १० लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. विनापरवाना अन्न व्यवसाय करणा-यांविरुदध कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व अन्न व्यावसायिकांनी परवाना/नोंदणी करावी. तसेच ज्या अन्न व्यावसायिकांकडे असलेल्या परवान्याचे मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करुन घ्यावे. अन्यथा रुपये ६०००/- इतका दंड असून मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होत असून संबधित व्यवसाय विना परवाना व्यवसाय गृहित धरुन त्यांच्याविरुदध कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांची https://foscos.fesai.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांच्या आत असेल अशा दुकानांनी अन्न नोंदणी करणे व ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल अशा अन्न व्यावसायिकांनी अन्न परवानासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.