जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२५ । मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. डांबून ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला होता, ज्यात रोहित आर्याच्या छातीला गोळी लागल्याने तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओत एका वेब सिरिजसाठी ऑडिशन चालू होते. या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आले होते. सहा दिवसांपासून ऑडिशनची ही प्रक्रिया चालू होती. सकाळी दहा वाजता मुले ऑडिशनसाठी जायची. त्यानंतर रात्री आठ वाजता मुले स्टुडिओच्या बाहेर पडायची. त्याआधी दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली जायची. आज मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नव्हती. त्यानंतर 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती.

मुलांना डांबून ठेवल्याचे समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली होती. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन चालू केले होते. यादरम्यान पवई पोलिसांकडून 17 मुलांसह 19 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये रोहित आर्या गंभीर जखमी झाला होता.
यावेळी रोहित आर्याने पोलिसांवरती फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या क्रॉस फायरिंगमध्ये छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली होती. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमध्ये एक लहान मुलगी आणि एक वृद्ध महिला सुद्धा जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.




