⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कर्जदारांसाठी आनंदवार्ता..! EMI चा हप्ता कमी होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । 14 फेब्रुवारी 2024 । एकीकडे महागाईचा मार आणि दुसरीकडे वाढलेला ईएमआय या दोघात ग्राहक होरपळला. कर्जावरील हप्ता कधी कमी होईल, याची अनेक जण वाट पाहत आहेत. मात्र आता कर्जदारांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. खरंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एका वर्षात रेपो दरात कुठलाच बदल केलेला नाही. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पॉलिसी दरात 250 बीपीएस वाढल्यामुळे ग्राहकांना अधिक दराने व्याज चुकवावे लागत आहे.

मात्र आता घाऊक महागाई कमी झाल्यामुळे रेपो दरात कपातीची आशा वाढली आहे. जगभरातच नाही तर भारतात पण महागाई कमी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता लवकरच कमी होण्याचा अंदाज आहे, काय आहे नेमकी अपडेट?

सध्या जगात दोन युद्ध सुरु आहेत. हे युद्ध जर लवकर आटोक्यात आली तर मोठा फरक पडेल. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिजच्या रिपोर्टनुसार, आरबीआय आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या शेवटमध्ये याविषयी निर्णय घेईल. त्यानंतर तिसऱ्या तिमाहीत रेपो दरात कपात होईल. म्हणजे या वर्षाच्या अखेरीस ईएमआय कपातीला सुरुवात होईल.

या जानेवारीत CPI महागाई, किरकोळ महागाई केंद्रीय बँकेच्या अपेक्षेनुसार 5.1 टक्क्यांपर्यंत उतरली आहे. तर घाऊक महागाईने पण दिलासा दिला आहे. सर्वात अगोदर भाजीपाला, त्यानंतर फळं, मसाले, डाळी, तेल आणि इतर भावात घसरण आली आहे. दरम्यान जानेवारीत धान्य, मांस आणि मासे, अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली. गेल्या काही महिन्यांपासून घाऊक महागाईत वाढ दिसून आली. यंदा लहरी हवामानाचा मोठा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. महागाई घसरल्याने रेपो दरात कपातीचा मार्ग मोकळा होत आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिजच्या रिपोर्टनुसार, यंदाच रेपो दरात कपात होईल. आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत खाद्य किंमती कमी होईल. अमेरिकन केंद्रीय बँक सुद्धा दरात कपातीचे धोरण सुरु ठेवण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक वर्ष 24 च्या दुसऱ्या सहामाहीत त्याचा परिणाम दिसेल. आरबीआयच्या आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरीस बदल दिसून येईल. आता किती कपात होईल, हे सांगणे कठिण आहे. पण ईएमआय कमी होण्याची दाट शक्यता आहे.