जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । अमळनेरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. पाण्याच्या मोटारीचा ईलेक्ट्रीक शॉक लागल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अमळनेर शहरातील गजानन नगरात घडली असून हर्षल योगेश पाटील (वय-१३) असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेनं कुटुंबियाला मोठा धक्का बसला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, हर्षल पाटील हा मुलगा आपल्या परिवारासोबत वास्तव्याला होता. सोमवार १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता घरी कुणीच नव्हते. पिण्याचे पाणी आल्याने हर्षल हा ईलेक्ट्रीक मोटार लावून घरात पाणी भरत होता. त्यावेळी त्याला ईलेक्ट्रीक मोटारीतील विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा लहान भाऊ संदीप हा शाळेतून घरी आला तेव्हा हा प्रकार लक्षात आला.
त्याला नातेवाईकांनी उचलून तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ हितेश चिंचोरे हे करीत आहे.