जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । भाजपातून बाहेर पडल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत आल्यानंतर खडसे यांनी भाजपा वारंवार टीका केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी अनेकदा निशाणा साधला. दरम्यान, नुकतेच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथराव खडसे यांचा विजय झाला असून शुक्रवारी त्यांनी आमदारकीची शपथ घेतली. शपथेवरनंतर चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवून खडसेंचे अभिनंदन केले.
राजकारणात कधीच कुणी कुणाचा नेहमीसाठी मित्र किंवा शत्रू नसतो. आपल्या राजकीय आयुष्याचे अनेक वर्ष भाजपमध्ये काढल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी भाजपला राम-राम करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत आल्यानंतर एकनाथराव खडसे यांनी भाजपविषयी असलेली नाराजी आणि शल्य उघडपणे व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ.गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली होती.
मधल्या काळात तर एकनाथराव खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा शाब्दिक सामना पाहायला मिळाला होता. नुकतेच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथराव खडसे यांचा विजय झाला आहे. शुक्रवारी सर्व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. शपथविधी आटोपल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरून एकनाथराव खडसे यांचे अभिनंदन केले. चंद्रकांत पाटलांनी खडसेंचे अभिनंदन केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.