जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२४ । राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीत अजून सस्पेंस कायम आहे. असं असताना आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या मुख्यमंत्र्याला आमचा पाठींबा असेल असं म्हणाले असून एकंदरीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण भेटत आहोत. त्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम मतदार आणि जनतेला धन्यवाद देतो. आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो. याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाला, ही लँडस्लाईड व्हिक्ट्री आहे. ‘गेल्या अनेक वर्षात असा विजय मिळाला नाही. जे काही अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं, लोकांनी जो विश्वास दाखवला, एकीकडे विकास कामे, जी महाविकास आघाडीने थांबवली होती. ती आम्ही पुढे नेली. त्याचं प्रतिबिंब पाहत आहोत. त्यात मी जात नाही. कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घातली. त्यामुळे हा विजय झाला. हा जनतेचा विजय आहे. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. लाडकी बहिणींचा लाडका भाऊ मी झालो. ही माझी ओळख निर्माण झाली. ही ओळख मी सर्वात मोठी मानतो.’असं ते म्हणाले
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत होती. अखेर याबाबतच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं
मी काल नरेंद्र मोदींना फोन केला, सरकार बनवताना माझ्यामुळे काही अडचण नाही .तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.