जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. परंतु याच दरम्यान, एकनाथ खडसे अचानक दिल्लीला गेल्याने त्यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच वेग आला. मात्र या चर्चांवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी दिल्लीत जाण्याचे कारणही सांगितले.
काय म्हणाले खडसे?
आपण भाजपामध्ये जात असल्याच्या चर्चामध्ये तथ्य नाही. ज्यावेळी असा काही निर्णय घ्यायचा असेल तर आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देईल. तूर्त भाजपात जाण्याचा निर्णय नाही, असे खडसे म्हणाले. एखादा पक्ष सोडण्याचा निर्णय एका दिवसांत, एका क्षणात होत नसतो. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना अन् सहकाऱ्यांना विश्वासात घ्यावे लागते. त्यानंतर निर्णय घेतला जातो. त्यावेळी सध्याच्या पक्षाने आपल्याला मदत केली आहे, त्या पक्षालाही विश्वासात घ्यावे लागेल.
परंतु सध्या अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले. तसेच जेव्हा, जेव्हा अशा विषय होईल, त्यावेळी मी त्याबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना देईल, असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले.
खडसेंनी सांगितले दिल्लीत जाण्याचे कारण?
एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाण्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले, माझ्या एका केसची सुप्रीम कोर्टाची तारीख होती. त्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. आता त्या केसची २५ तारीख मिळाली आहे. मात्र मी दिल्लीला गेलो की अनेकांशी भेटीगाठी होत असतात. मात्र, यावेळी म्हणजेच काल दिल्लीला त्या भेटी होऊ शकलेल्या नाही. माझे नरेंद्र मोदी, जे.पी.नड्डा, अमित शाह यांच्याशी वैयक्तीक संबंध होते आणि आताही आहे. यामुळे त्यांना भेटण्यासाठी आपणास कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, असे खडसे यांनी पुन्हा म्हटले.