⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

मंत्री गिरीश महाजनांना आ.खडसेंची नोटीस, सात दिवसात माफी मागावी

जळगाव लाईव्ह न्यूज | २६ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांना काही दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. खडसे जळगावात परतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी ‘१३७ कोटींची नोटीस आल्याने हे नाटक केले’ असे खडसेंना उद्देशून म्हटले होते. मंत्री महाजन यांच्या वक्तव्यानंतर आ.खडसे यांच्यातर्फे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसात माफी मागावी आणि लेखी हमी द्यावी, असे नोटीसद्वारे कळवण्यात आले आहे.

जळगाव येथील निवासस्थानी रविवारी आ.एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांना कॉर्डियक अटॅक आल्याने दि.६ नोव्हेंबर रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केल्यावर एअर अँब्युलन्स उपलब्ध झाल्यानंतर खडसेंना जळगावातून मुंबई येथे हलविण्यात आले होते. प्रकृती सुधरल्यानंत्र नुकतेच ते जळगावात परतले आहेत. दरम्यान, आ.खडसे जळगावात आल्यावर खडसे विरुद्ध महाजन असे शाब्दिक युद्ध रंगले आहे.

काही दिवसापूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, एकीकडे ढोंग करायचे.. सोंग करायचे.. कारण नसताना दवाखान्यात येऊन बसायचे.. १३७ कोटींची नोटीस आल्यावर आणि इकडे स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचे.. नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळवण्यासाठी कोर्टाकडे.. ही सगळी नाटकं केलेली आहे. असे वक्तव्य केले होते. आ.एकनाथराव खडसे यांनी सर्व वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून अँड.अतुल सूर्यवंशी व अँड.हरुल देवरे यांच्या माध्यमातून ना.गिरीश महाजन यांना नोटीस बजावली आहे.

आपण आमच्या पक्षकाराची बदनामी करण्याच्या एकमेव हेतूने वापरलेल्या विधानाने जाहीररीत्या माझ्या पक्षकाराची बदनामी केली आहे. तुम्ही दिवाणी व फौजदारी कार्यवाहीसाठी पात्र असे कृत्य केले आहे. माझे पक्षकार कार्यवाही करण्याच्या तयारीत असून तुम्हाला एक संधी देण्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसाच्या आत लेखी आणि माध्यमांसमोर माफी मागावी. माझे पक्षकार व त्यांचे कुटुंबीय यांची बेअब्रू होईल असे कृत्य अथवा भाषण करणार नाही, अशी लेखी हमी द्यावी. असे करण्यास तुम्ही कसूर केल्यास फौजदारी खटला आणि अब्रू नुकसानीपोटी १ रुपयांचा दावा दाखल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.