दूध संघात १ कोटींची चोरी, दूध संघाच्या एमडींनी दिली पोलिसांना फिर्याद
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ मर्यादित जळगावमध्ये पांढरे लोणी सातारा शीतगृहात पाठवल्याची नोंद करीत १ ते १.१५ कोटींची चोरी करण्यात आल्याचा आरोप माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंनी केला आहे. दुपारी ४ वाजेपासून खडसेंसह दूध संघाचे संचालक व समर्थक शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले आहेत. खडसेंची तक्रार घेतली जात नसल्याने रात्री ११ वाजता दूध संघाचे कार्यकारी संचालक यांनी शहर पोलिसांना फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होणार की नाही हे अद्याप निश्चित नसून पोलीस निरीक्षकांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.
दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेली फिर्याद पुढीलप्रमाणे, श्री. मनोज गोपाळ लिमये, वय ५९ वर्ष, धंदा-नोकरी, रहिवासी- जळगांव जिल्हा सहकारी दूध संघ यांचे कॅम्पस, शिवाजी नगर रोड, जळगांव मोबाईल नं. ९४०३०८००७४, समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून लेखी फिर्याद देतो की, मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर रहावयास आहे. मी जळगांव जिल्हा सहकारी दूध उत्पादक मर्यादित येथे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहे. मी सदर विभागात मार्च २०२० पासून कार्यरत आहे. माझ्या अंतर्गत संपूर्ण दूध संघाची जबाबदारी असून माझ्यावर नियंत्रण हे संचालक मंडळाचे असते. येणाऱ्या कोजागिरी व दिवाळी सणांच्या निमित्ताने लोणी व दूध भुकटी साठा दूध व तूप मागणीची पुर्तता करण्यााठी मागणी नुसार पुरेसा उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी म्हणून तपासणी करण्याचे ठरविले.
दिनांक ८ ऑक्टोंबर, २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता मी, श्री. संदिप झाडे, श्री. स्वप्निल जाधव, श्री. रवी वानखेडे, श्री. नितिन पाटील व श्री. महेंद्र केदार यांना विक्री विभागातील पांढऱ्या लोण्याचा प्रत्यक्ष साठा याची अचानक तपासणी करण्याचे निर्देश दिलेत. त्यांनी माझ्या आदेशाप्रमाणे संपूर्ण विक्री विभागाची स्टॉक तपासणी केली. त्यात त्यांना असे निदर्शनास आले की, दिनांक २ ऑक्टोबर, २०२२ रोजी १४ टन पांढरे लोणी (७०० बॉक्स) ज्याची अंदाजित किंमत रु. ७०-८० लाख आहे. संघाच्या बाहेर वाई, जिल्हा सातारा येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिष्टरमधे घेण्यात आली आहे. प्रत्यक्षात असे कोणतेही वाहन माल लोड होवून संघाच्या आवाराबाहेर गेल्याची नोंद गेट इन व आऊट चे रजिष्टर मधे मिळून आली नाही आणि त्याबद्दल प्रचलीत कार्यप्रणाली नुसार इतर कोणत्याही रेकॉर्डमधे अशा प्रकारे वाहन माल घेवून बाहेर गेल्याबद्दल नोंदी आढळून आल्या नाहीत. यावरुन प्रथमदर्शनी असे निदर्शनास आले की, प्रत्यक्ष पांढरे लोणी स्टॉक मधे रेकॉर्डपेक्षा कमी असल्यामूळे असलेली घट लपविण्यासाठी दिनांक २ ऑक्टोंबर, २०२२ रोजी पांढरे लोणी वाई, जिल्हा सातारा येथील शीतगृहात पाठविल्याची खोटी नोंद घेतलेली आहे. तसेच दिनांक ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी मी, श्री. संदिप झाडे, श्री. स्वप्नील कारले, श्री. नितिन पाटील, श्री. एन. व्ही. पाटील, श्री. प्रशांत बावस्कर अशांना दूध पावडरचे स्टॉक चेक करण्यासाठी प्रत्यक्ष तपासणीकामी पाठविले असता त्यांनी चेक केले. अभिलेखानुसार ९ मे. टनाची म्हणजे ३६० बॅग्ज तफावत आढळून आली. ज्याची अंदाजे किंमत रु. ३०-३५ लाख आहे. असे त्यांचे तपासणीतून समोर आले आहे. असे एकंदरीत १ कोटी ते १ कोटी १५ लाख रुपयांच्या मालाची चोरी झाली असे एकंदरीत तपासणीतून समोर आले आहे.
तथापि, दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२२ पूर्वी श्री. अनंत अशोक आंबीकर, श्री. महेंद्र नारायण केदार आणि सहाय्यक डॉ. सुनील चव्हाण व इतरांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडमधून १४.०० मेट्रिक टन लोणी (७०० पेटी) आणि ९.०० मेट्रिक टन दूध भुक्ती (३६० पिशव्या) चोरून नेले, ज्याची एकूण अंदाजे किंमत रु. १.०० कोटी ते रु. १.१५ दशलक्ष समतुल्य आहे. दिनांक १२ ऑक्टोबर, २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मी, स्वतः शहर पोलीस स्टेशन, जळगांव येथे या संदर्भात फिर्याद देण्यास व संशयीत आरोप कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी लेखी तक्रार देण्यास गेलो असता माझा जबाब मा. सहा. पोलीस निरिक्षक, नियंत्रण कक्ष, जळगांव यांनी लिहून घेतला. हा जबाब मला मान्य नाही. कारण हा जबाब मी सांगीतल्यापेक्षा वेगळा आहे, मी सांगीतले होते की, चोरी झाली आणि त्यांनी अपहार झाला असे लिहिले. मी याबाबत त्यांना विचारले असता पोलीसी भाषेत असेच लिहिले जाते असे मला सांगीतले व तुम्ही फक्त सही करा असे सांगीतले.
मी जळगांव दूध संघात चोरी झालेली आहे असे सांगीतले तर मला असे सांगण्यात आले की, चोरी आणि अपहार हा एकच शब्द आहे. या जबाबामधील बराचसा मजकूर बदलवून टाकलेला आहे. मी फिर्याद देण्यासाठी गेलो होतो तर माझी फिर्याद न घेता माझा जबाब नोंदविला हे कायद्याला धरून नाही असे मला वाटते. तसेच मला असे सांगण्यात आले की, यापूर्वी दूध संघात दाखल असलेल्या गुन्हयाला हा जबाब क्लब केला जाईल. परंतू पहिल्या दाखल गुन्हयाशी याचा काहीही संबंध नाही. माझी ही स्वतंत्र तक्रार आहे. माझा लिहून घेतलेला जबाब हा अप्रामाणिकपणे लिहून घेतलेला आहे. हा जबाब माझेवर दबाव आणून लिहून घेतलेला आहे. म्हणून मी आज स्वतः ही लेखी फिर्याद देत आहे. माझी तक्रार नव्याने नोंदवून घ्यावी अशी माझी मागणी आहे. संशयीत आरोपी कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद मी देत आहे. कृपया सदर फिर्यादची नोंद करुन घ्यावी व संशयीत आरोपी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा ही विनंती. ही माझी कायदेशीर फिर्याद आहे.