⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा ; आ. एकनाथ खडसे

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करा ; आ. एकनाथ खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । जळगांव जिल्ह्यातील अवैधरीत्या वाळू उपसा करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याबाबत आ. एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले जळगांव शहरातील रामानंद घाट नजीक दिनांक १८ मार्च, २०२४ रोजी अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील मंडळ अधिकारी यांना असभ्य भाषा वापरून, भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरखाली ओढून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून करण्यात आला आहे.

तसेच यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीस पथकास डंपर भरधाव वेगाने नेऊन चिरडण्याचा प्रयत्न वाळू माफियांकडून दिनांक १० मार्च, २०२४ रोजी करण्यात आला आहे, उपरोक्त प्रकरणी शासनाने संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली आहे व अवैध वाळू उपसा रोखण्याचे काम करणाऱ्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांकडून हल्ला होण्याचे प्रमाण वाढले असल्याने पुन्हा होऊ नये यादृष्टीने शासनाने कायमस्वरूपी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अवैधरीत्या वाळू उपसा करून शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले ते म्हणाले जळगांव शहरातील रामानंद घाट नजीक दिनांक १८/०३/२०२४ रोजी वा त्यादरम्यान अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील मंडळ अधिकारी यांना वाळू माफियांकडून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक व इतर २ व्यक्तींवर भादवि कलम ३५३, ३७९, १८६, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गु.र.नं. ८८/२०२४ दाखल केला ट्रॅक्टर चालक यांना अटक होवून ते जामीनावर सुटलेले आहेत.

यावल तालुक्यातील यावल फैजपूर रस्त्यावर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीस पथकास डंपरने चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध भादवि कलम ३५३, ३०७, ३७९, २७९, ३३७, ४२७, ३४ व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४८ व मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कमल १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा गु,र.क्र. ५९/२०२४ असा आहे.

जळगांव जिल्ह्यात दिनांक ०१/०३/२०२४ ते ३०/०५/२०२४ या कालावधीत एकूण ८४१ प्रकरणी रुपये ६८७.३८ लाख दंडाची रक्कम वसूल करून ९४ गुन्हे दाखल करून ३४ वाहने जप्त केली आहेत. पथकाच्या दौऱ्याच्या मार्गावर वाळू चोरी करण्याऱ्या व्यक्तीकडून पाळत ठेवणारे, पाठलाग करणारे इसम यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही/ गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा वाळू संनियंत्रण समितीच्या सभेत महसूल व पोलीस अधिकाऱ्यांना देऊन भविष्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्या असल्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.