जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. हे नेते एकमेकांवर नेहमीच चिखलफेक करत असतात. पण आता एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.
एकनाथ खडसे अन् गिरीश महाजन एकत्र येणार का? असे विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, माझी इच्छा आहे की, भारतीय जनता पार्टीसोबत जेवढे लोक जोडतील. तेवढी आमच्या पक्षाची ताकद वाढेल. नाथाभाऊ हे भाजपमधील खूप जुने नेते आहेत. त्यामुळे गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ यांनी एकत्र येऊन काम केलं तर जिल्ह्याच्या विकासासाठी चांगलंच आहे. नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ यांना एकत्र आणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या की, नाथाभाऊ हे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशासंदर्भात आमचे केंद्राचे आणि राज्याचे वरिष्ठ नेते लवकरच निर्णय घेतील. योग्य वेळी नाथाभाऊंचा प्रवेश होईल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.