जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । अमळनेर येथे ३१ ऑक्टोबर रोजी बसस्थानकात आढळून आलेल्या दीड दिवसाच्या स्त्री अर्भकाची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु असलेली मृत्यूशी झुंज शनिवारी संपली.
अमळनेर बसस्थानकात दि.३१ ऑक्टोबर रोजी स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठांना कळवून या नवजात अर्भकाला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. एम. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथमोपचार करून त्याला जीएमसीत हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पोलिस कर्मचारी सारिका जरे व सुनीता पाटील यांनी बाळासोबत जीएमसी गाठले. सीएमओ डॉ. स्वप्निल कळसकर, बालरोगतज्ज्ञ डॉ.हितेंद्र भोळे, नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. शैलजा चव्हाण यांनी उपचारांची व्यवस्था केली.
अवघ्या दीड दिवसाच्या या बाळाचे प्राण्यांनी लचके तोडल्याने त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. प्रकृती गंभीर असल्याने बाळाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला.