बापरे…! दारूच्या नशेत पत्नीला पाजले उंदीर मारण्याचे औषध, पतीविरोधात गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । 7 फेब्रुवारी 2024 । जामनेर तालुक्यातील ओझर येथून धक्कादायक घटना समोर आलीय. दारूच्या नशेत पत्नीला उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. याबाबत पती दिगंबर तुकाराम शेगर याच्याविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की ओझर येथे कमलाबाई दिगंबर शेगर या पती दिगंबर शेगर यांच्यासह वास्तव्यास असून मागील काही दिवसापासून या दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरु होता. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला. यामध्ये दारूच्या नशेत दिगंबर तुकाराम शेगर यांनी पत्नी कमलाबाई शेगर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली तसेच त्यांना जीवेठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या तोंडात उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजले.
दरम्यान कमलाबाई यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. दरम्यान त्यांचे प्रकृती आता स्थिर आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दिगंबर तुकाराम शेगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहे.