जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२४ । राज्यासह जळगावात गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उन्हाच्या झळा बसत आहे. फेब्रुवारीपासूनच उन्हाची चाहूल लागू लागते. आता थंडी कमी झाली असं मानलं जात होते. मात्र, जळगावात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. कमाल-किमान तापमान घसरले असून यामुळे वातावरणात अचानक गारवा वाढला. त्यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला.
राज्यासह जळगावमध्ये या महिन्याच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब झाली. गेल्या रविवारी (१८ फेब्रुवारी) जळगाव शहराचे कमाल तापमान ३६ अंशावर तर किमान तापमान १८ अंशावर गेले होते. यामुळे दुपारच्या वेळेस उन्हाच्या झळा बसत होत्या.
मात्र गेल्या दोन तीन दिवसात कमाल-किमान तापमानात घसरण झाली. शुक्रवारी जळगाव शहराचे कमाल ३१.४ अंश तर किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअस इतके होते. यामुळे गुरुवारी रात्रीनंतर गारठा वाढला होता आणि पहाटे कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली.