जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । होमिओपॅथिक या वैद्यकीय क्षेत्रात गत ३५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या डॉ.सुनीलदत्त चौधरी यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्राची सावली’ हा राज्यस्तरीय पुरस्कार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वामीराज प्रकाशन व पालवी फाऊंडेशनतर्फे वैद्यकीय क्षेत्र व सामाजिक क्षेत्रातील अबोली प्रतिष्ठान जळगाव या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल डॉ. सुनीलदत्त चौधरी यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्यावतीने त्यांचे स्नेही जयंत नेवे यांनी हा पुरस्कार स्विकारला.
तमाम पीडित रुग्णांचे कैवारी म्हणून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आपुलकीने, आत्मीयतेने ज्या नावाचा उल्लेख होतो ते आहेत सुनीलदत्त चौधरी. होमिओपॅथिक या वैद्यकीय क्षेत्रात गेली ३५ वर्ष ते कार्य करीत आहेत. वैद्यकीय सेवा हा मुख्य व्यवसाय असला तरी त्याला सामाजिक कार्याची जोड आहे. शहरापासून दूर अंतरावरील रुग्णांसाठी ते वेळ राखून ठेवतात व विनामुल्य उपचार करतात.
गावातील गरिबांना अर्थसहाय्य, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन, वृद्धांना आरोग्यासाठी जागृत ठेवणे आदी निःस्वार्थी भावनेने त्यांचे कार्य चालते. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्त्री कर्मचार्यांची टीम तयार करून सॅनिटरी पॅड कसे वापरायचे आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची याचे प्रशिक्षण दिले. जे समोर येऊ पाहत नाहीत त्यांच्यासाठी प्रबोधनपर लोककलेची निर्मिती केली. त्यांच्या या कामाची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे.
पहा व्हिडिओ वृत्त :