जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२३ । समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचत असून त्या अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी व डॉ. बाबासाहेबांचे विचार जनसामान्यात रुजविण्यासाठी जिल्हाभरात ५५ कोटी रूपयांच्या निधीतून १३८ संविधान भवन बांधण्यात येणार आहेत. मागासवर्गीयांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. डाॅ. बाबासाहेबांचे विचार हे कृतीत आणून समाज उत्थानाचे काम करावे. असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत राज्यभरात “सामाजिक न्याय पर्व २०२३” विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हा नियोजन भवन येथे व्याख्यानाचे आयोजन समाजकल्याण विभाग, जळगावच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजी नगरचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वासुदेव मुलाटे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, तृतीयपंथी कल्याण मंडळ सदस्य शामिभा पाटील , समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी , सचिन पवार, रविंद्र चव्हाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विनोद ढगे व सहकाऱ्यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. तर यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो, जळगावच्या वतीने सदर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
यावेळी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वासुदेव मुलाटे म्हणाले, कुठलेही महापुरुष कोणत्याही जाती धर्माचे नसतात तर ते एकाच जातीचे असतात ते म्हणजे माणूस असे मत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न विचारण्याचे सामर्थ्य समाजामध्ये निर्माण केले. तसेच भाषा हृदयाचा श्रृंगार असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत नीतिमान समाज निर्मितीसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समाज कल्याण विभाग करीत असलेल्या उपक्रमांचे व कामांचे कौतुक करून अनुसूचित जाती जमाती घटकांसाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासित केले.
यावेळी योगेश पाटील सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी आपल्या प्रास्ताविकात समाजकल्याण विभाग राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक न्याय पर्वानिमित्त महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहचवून समाज कल्याण विभागाचे विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासठी राबविण्यात असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक लेखाधिकारी मनीषा पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार कार्यालय अधिक्षक राजेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधिकारी कर्मचारी व कार्यालयीन तालुका समन्वयक महेंद्र पाटील, जितेंद्र धनगर, चेतन चौधरी, किशोर माळी, अनिल पगारे व यांनी विशेष प्रयत्न केले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
समाजकल्याण विभागाच्या वतीने वर्षभरात आयोजित केलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत विंविध उपक्रम राबविण्यात आले. यात विविध योजनांचे बक्षीस वाटप, स्वाधार शिष्यवृत्तीचे वाटप, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र वाटप, कन्यादान योजना तसेच कला व क्रीडा क्षेत्रांतील स्पर्धा प्रमाणपत्रांचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.