चोरट्यांचा धमाकूळ ; पाचोऱ्यात एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेट्या फोडल्या
जळगाव लाईव्ह न्यूज | 4 फेब्रुवारी 2024 | जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस घरफोडीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पाचोरा शहरात एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड व दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
याबाबत असे की, पाचोरा शहरातील त्र्यंबकनगर व कृष्णापुरी भागात असलेले रेणुका देवी मंदिर व महादेव मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. यातील रेणुका मंदिराच्या दानपेटीतील सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने, तसेच महादेव मंदिराच्या दानपेटीतील ८० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविण्याचा अंदाज रहिवासी व भाविकांकडून व्यक्त करण्यात आला.
मंदिरातील दानपेट्या चोरट्यानी फोडल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी मंदिरे लक्ष केल्याने परिसरातील रहिवासी व भाविकांमध्ये भीती पसरली आहे.