जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे पूर्ववैमनस्यातून वाद होऊन त्यातून झालेल्या चाकूहल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तळवेल येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या वादाला प्रेमविवाहाची किनार असल्याचे समोर आले.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाले होते. २ मार्चच्या रात्री तुकाराम नगरातील एका लग्नसमारंभात हे वाद पुन्हा उफाळून आले. त्यात संशयित गणेश किशोर भारंबे याने केलेल्या चाकूहल्ल्यात निखिल प्रदीप पाटील, प्रसाद पाटील व तुषार भारंबे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने हस्तक्षेप करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर लग्नसमारंभ आणि गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी निखिल प्रदीप पाटील (वय २८, रा.तळवेल) यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश किशोर भारंबे, किशोर हरी भारंबे, स्वाती किशोर भारंबे (सर्व रा.तळवेल) यांच्याविरुद्ध वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
वादाचे कारण असे
या घटनेतील फिर्यादीच्या मित्राने गावातील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. ती मुलगी भारंबे कुटुंबातील होती. तेव्हापासून फिर्यादी निखिल पाटील व चाकू हल्ल्यातील संशयित गणेश भारंबे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली.