जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. दरम्यान, सभागृहात राज्यातील कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या चांगलीच खडाजंगी झाली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कापसाला हमीभाव देण्यासंदर्भात मांडलेल्या २८९ च्या प्रस्तावा दरम्यान खडसे यांनी जळगावसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. खडसे यांनी सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ६ हजार रुपये अनुदान देण्यासोबतच अधिवेशन संपण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबतीत काय तो निर्णय जाहीर करा, अशी मागणी केली.
तसेच गिरीश महाजन यांनी कापसाच्या प्रश्नावर केलेल्या उपोषणाची आठवण करून देतांना टोलेबाजी केली. शेतकऱ्यांचा ५० टक्के कापूस हा अजूनही घरात पडून आहे, तो तुम्ही सोडवा. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, असे बोलले जाते, पण मला वाटत नाही असा चिमटा खडसे यांनी काढला. यावर मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे असे उत्तर महाजन यांनी दिले.
सध्या जिनिंग आणि प्रेसिंगसुद्धा बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कापसाचे करायचे काय? तो जाळून टाकयचा की फेकून द्यायचा, ते तरी शासनाने एकदा सांगून टाकावे, असा संतापही खडसेंनी व्यक्त केला आहे.