जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२५ । एमडी ड्रग्ज गुन्ह्यातील आरोपीशी ३५२ वेळा संपर्कात असल्याच्या कारणावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना पोलिस मुख्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

तर पोलिस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या महत्त्वाच्या विभागात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना एलसीबीतून काढून शहराबाहेरील दोन पोलिस ठाण्यात बदली केली. गजानन देशमुख व संदीपाल जाधव असे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची पाचोरा व फत्तेपूर या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
एलसीबीत कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्याबाबत त्यांचे शहरातील एमडी ड्रग्ज विक्रेत्यांसोबत संबंध असल्याबाबत तक्रारीची चौकशी करण्यात आली. पीएसआय पोटे यांचे शहरातील एमडी ड्रग्ज साठा प्रकरणात फरार असलेला व दुबईला पळून गेलेल्या अरबाज या संशयितासोबत ३५२ वेळा फोनवर संवाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. गुरुवारी याबाबत पोलिस अधीक्षकांच्या दालनात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, एलसीबीचे पोलिस निरीक्षक यांच्या चौकशी समितीने याबाबत चौकशी केली. यात पोटे यांच्या मोबाइलच्या डीसीआरमधील संवादाबाबत चौकशी करण्यात आली.
संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकवले, आक्षेपार्ह काही नाही :
एसपी उपनिरीक्षक पोटे यांचे ड्रग्ज प्रकरणातील संशयिताशी झालेल्या सर्व संभाषणांचे रेकॉर्डिंग असून ते ऐकवण्यात आले. त्यात आक्षेपार्ह काही नसल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले. दरम्यान, उपनिरीक्षक पोटे यांची महिनाभरापूर्वी एलसीबीतून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.