जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२१ । अमळनेर धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे,या प्रमुख मागणीसाठी युवा मल्हार सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकापासून ते आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढून आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर समाजाच्या वतीने आमदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले,यात पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आमदारांनी सभागृहात उपस्थित करावा,आदिवासीप्रमाणे १००० कोटींच्या योजना समाजाला उपलब्ध करून द्याव्यात,धनगर समाजाच्या आरक्षणाची याचिका लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करून त्यावरील खर्च शासनाने करावा अशा व इतर मागण्या यावेळी मांडल्या. यावेळी समाजाच्या वतीने डी.ए.धनगर ,युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान धनगर यांनी समाजाची बाजू आमदारांसमोर मांडली. आमदार अनिल पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद पावसाळी अधिवेशनाचा कालावधी जरी कमी असला तरी हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी पुरेपूर सहकार्याचे आश्वासन आमदारांनी दिले.तसेच अमळनेर धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची भेट ना.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांच्याशी करून त्यावर सविस्तर चर्चा पुढील काळात केली जाईल. समाजासाठी १००० कोटींच्या ऐवजी तो निधी १५०० कोटींपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असेल, आमदार अनिल पाटील यांनी आतापर्यंत धनगर समाजाच्या मागण्यांचा नेहमीच विचार केला आहे. धनगर समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी तत्परतेने त्यांनी १० लाखाचा निधी मंजूर केला होता. मात्र काही कारणामुळे या कामाला ब्रेक लागला.समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी आमदारांनी सकारात्मक चर्चा केली. यावेळी उत्तर महाराष्ट्र युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष देवा लांडगे,दशरथ लांडगे,शांताराम ठाकरे,दिलीप ठाकरे,आलेश धनगर,चंद्रकांत कंखरे,धंनजय धनगर,प्रा.एल.ए.निळे,योगेश धनगर,अनिल ठाकरे,शरद पवार,हरचंद लांडगे,रमेश धनगर तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.