⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | बातम्या | ‘अकेला देवेंद्र‘ चे सब समाज को साथ लेकर चलो धोरण

‘अकेला देवेंद्र‘ चे सब समाज को साथ लेकर चलो धोरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेली राजकीय उलथापालत व बदललेली राजकीय समीकरणे ही कोणत्याही धक्का तंत्रापेक्षा कमी नव्हती. त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांच्या निशाण्यावर एकच व्यक्ती होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस! अकेला देवेंद्र क्या करेगा….. अशा शब्दात त्यांची हेटाळणी केली गेली. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवले. या राजकीय उलथापालतीमुळे महाराष्ट्राचे राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांचे वजन कमी झाले, देवेंद्र फडणवीस संपले असे देखील विरोधकांकडून बोलले जाऊ लागले. मात्र आपणच खरे राजकीय चाणक्य आहेत हे दाखवून देत फडणवीस यांनी अवघ्या दोन अडीच वर्षात बाजी पलटवत सर्व विरोधकांना एका दणक्यात गार केले.

महाराष्ट्राचे राजकारण मोजक्या दोन-तीन नावांच्या अवतीभवती फिरते त्यापैकी एक नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. संघाच्या मुशीत तयार झालेले फडणवीस महाराष्ट्राचे राजकारणाची चाणक्य म्हणून ओळखले जातात. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा अनेक प्रकारांनी चर्चित राहिला. याचं कारण म्हणजे जेव्हा महाराष्ट्रात महायुतीने बहुमत मिळवले तेव्हा मुख्यमंत्री म्हणून अनेक नावे चर्चेत होती. यात नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील यांची सर्वांचे नाव अधून मधून आघाडीवर असायची मात्र बाजी मारली ती देवेंद्र फडणीस यांनी.

सर्वाधिक आंदोलने तरी विकास हाच अजेंडा
त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक मोर्चे व आंदोलने झाली असे म्हटले जाते. मराठा आरक्षणाचे वादळ त्यांच्याच कार्यकाळात घोंगावत राज्यभर मूक मोर्चा निघाले. त्यावेळी अनेक जटील प्रश्नांना मोठ्या कुशलतेने हाताळले त्यांनी कायद्याच्या चौकटीत बसेल असे मराठा आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्रात राजकीय उलतापालथून महाविकास आघाडीचे सरकार आले यावेळी तत्कालीन राज्यकर्त्यांनी हा विषय योग्य पद्धतीने न हाताळल्याने हे आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही. विकास हा त्यांचा मुख्य अजेंडा होता. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला विकासाच्या महामार्गावर नेण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांची केवळ पायाभरणी केली नाही. तर योग्य वेळेत बहुतांश प्रकल्प मार्ग ही लावले. विशेष म्हणजे भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही. त्यांची महत्त्वकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार, शेततळे, मेट्रो, समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.

फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इतकी वर्ष राजकारणात असताना त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था नाही सूतगिरणी नाही साखर कारखाना नाही. किंवा स्वतःचे उद्योगधंदे देखील नाही. यामुळे त्यांना निस्वार्थ राजकारणी देखील म्हटले जाते. महाराष्ट्राचा विकास हाच त्यांचा ध्यास असल्याचे त्यांच्या कृतीवरून ठळकपणे जाणवते.

मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न
आधी उल्लेख केल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा आरक्षणासाठी राज्यभर मुख्य निघाले. हा प्रश्न फडणवीस यांनी मोठ्या कुशलतेने हाताळला. राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठपुरावा करून सर्व कागदपत्रे त्यांनी उपलब्ध करून दिले व मराठा आरक्षणाला आरक्षण देखील मिळवून दिले. हे आरक्षण न्यायालयात देखील टिकले मात्र महाविकास आघाडीच्या काळात या विषयाला गांभीर्याने न पाहिले गेल्याने मराठा आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षण रद्द झाल्याचे खापर आपल्या माथी फुटू नये म्हणून विरोधकांनी त्यांना मराठा द्रोही ठरवण्यासाठी अनेक कारस्थाने रचल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

मात्र मराठा समाजासाठी त्यांनी केलेली भरीव कामे कुणीही नाकारू शकत नाही. फडणवीस यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण मिळवून दिले. याचा फायदा राज्यातील हजारो मराठा धरण तरुणांना झाला आहे उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 5 000 मराठा तरुणांना शासकीय नोकरीची कवाडे खुली झाली आहेत.

तरुणांना केले उद्योजक
फडणवीस यांना जाणीव होती की राज्यात सरकारी नोकरीची संधी कमी असून त्या तुलनेत नोकरी मागणाऱ्या तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे तरुणाईला स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा विडा त्यांनी उचलला. मराठा तरुणांनी उद्योग क्षेत्रात मोठी झेप घ्यावी यासाठी त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मराठा तरुणांना तब्बल 77 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेचा लाभ घेऊन आज शेकडो मराठा तरुण उद्योजक झाले आहेत याची श्रेय निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांना जाते.

शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजातील तरुण कोठेही मागे नाहीत मात्र त्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे असे विचार फडणवीस यांचा आहे. याच अनुषंगाने मराठा समाजातील तरुणांना सनदी सेवांमध्ये संधी मिळावी यासाठी त्यांनी सारथी राष्ट्रीय अधि छात्रवृत्ति योजनेला गती दिली. याच योजनेतून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अर्थात यूपीएससीमध्ये 51 मराठा तरुणांनी झेंडा फडकवला यात 18 आयएएस, 18 आयपीएस, 8 आयआरएस तर 12 विद्यार्थी अन्य सेवांमध्ये कार्यरत आहेत. या योजनेच्या माध्यमातून केवळ यूपीएससी मध्ये नव्हे तर राज्य लोकसेवा आयोगात देखील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 304 इतकी आहे. उपलब्ध माहितीनुसार या योजनेच्या माध्यमातून 2109 विद्यार्थ्यांना 87 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबत महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षेद्वारे 11400 विद्यार्थ्यांना 45 कोटी रुपये, किमान कौशल्य प्रशिक्षणासाठी तर सारथीतर्फे 35726 विद्यार्थ्यांना किमान कौशल्याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सर्व समाजाला न्याय
राज्याच्या उन्नतीसाठी विशेषता तरुणाईसाठी योग्य संधीची दारे उघडण्याकरता त्यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. जसे त्यांनी मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीच्या योजना राबविल्या त्याचप्रमाणे इतर समाजाच्या तरुणांसाठी देखील त्यांनी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत त्या त्या समाजाच्या तरुणांसाठी नवी संधीचे दारे उघडून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांचे फळ राज्यात स्पष्टपणे दिसून येत आहेत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक शासकीय वस्तीगृह सुरू करण्यास मान्यता दिली. हा निर्णय केवळ कागदपत्रे न राहता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी होईल याकडे त्यांनी कटाक्षाने लक्ष दिले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात एकूण 72 शासकीय वस्तीगृहांमध्ये 7200 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी तब्बल 73 कोटी 81 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. इतर मागासवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीची संख्या दहा वरून 75 करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानेच घेण्यात आला. शासनातर्फे ओबीसी विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील तीन लाख मेट्रिक पूर्व आणि 90 लाख मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या या शिष्यवृत्तीमुळे आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रगतीची प्रगतीच्या नव्या संधी खुल्या होत आहेत.

धनगर आणि भटक्या व विमुक्त जाती साठी योजना
राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. आरक्षणासह समाजाच्या अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष दिले. धनगर समाजासाठी 22 योजना सुरू करत त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्र शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना देखील करण्यात आली आहे

भटक्या व विमुक्त जातींसाठी 25000 तसेच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25 000 घरे बांधण्याकरता फडणवीस यांनी पुढाकार घेत यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इतर मागासवर्गीय समाजातील घटकांसाठी येथे तीन वर्षात मोदी आवास योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजने करता तीन वर्षांमध्ये 12000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विशेष म्हणजे पहिल्या तीन वर्षात तीन लाख घरांसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सब समाज को साथ लेकर चलो धोरण
सब समाज को साथ लेकर चलो…. हे धोरण फडणवीस यांनी अवलंबत विविध समाजांसाठी योजना राबवून तसेच त्याची अंमलबजावणी देखील करत राज्यातील सर्व समाजाच्या प्रश्नांना मार्गी लावण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठे योगदान आहे. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास लिंगायत समाजासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ तसेच राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचे स्थापना करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विविध समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे त्यांचे विरोधक देखील नाकारू शकणार नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.