जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । भारत आज ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असताना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेंदुर्णी गावात एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. मात्र, घटनेनंतर भर पावसात शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर जमून कठोर कारवाईची मागणी केली होती.

याबाबत असे की, शेंदुर्णी गावात एका महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला. महापुरुषाच्या पुतळ्याला हानी पोहोचवण्याचा हा प्रकार धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावणारा असल्याने, गावात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी भर पावसातही पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यांनी विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. “हे फक्त पुतळ्याची विटंबना नाही, तर आमच्या श्रद्धेची विटंबना आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या संशयिताची चौकशी सुरू असून, घटनेच्या मागील कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

नागरिकांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.” पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकू नयेत, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केलं आहे.









