जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२४ । इटारसी-भुसावळ ही मेमू आणि कटनी-भुसावळ एक्स्प्रेस या दोन गाड्यांच्या वेळेत कोरोना काळात बदल करण्यात आला होता. त्या वेळा अजूनही पूर्ववत न केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या वेळेत बदल करण्याची मागणी होत आहे. मध्य रेल्वेच्या कटनी व इटारसीकडून भुसावळकडे धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या कोरोनाच्या साथीपूर्वी सोयीच्या ठरत होत्या.
इटारसी भुसावळ मेमू ही कोरोनाच्या साथीपूर्वी खंडवा, बन्हाणपूर, वाघोडा, रावेर, निंभोरा व सावदा या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून पहाटे ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास धावत होती. परिणामी, जळगाव वा भुसावळ येथे उच्च शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्यांसाठी ही पॅसेंजर गाडी अत्यंत सोयीची होती. कोरोनाच्या साथरोगानंतर इटारसी-भुसावळ मेमू ही प्रवासी गाडी आता मध्यरात्रीनंतर १ ते ३:30 वाजण्याच्या सुमारास खंडवा, नेपानगर, बऱ्हाणपूर , वाघोडा, रावेर, निंभोरा, सावदा व भुसावळ दरम्यान धावत आहे. कटनी – भुसावळ एक्स्प्रेस ही प्रवासी गाडी दुपारी १ ते ३ ऐवजी सायंकाळी ४ ते ७ दरम्यान खंडवा, नेपानगर, बन्हाणपूर, वाघोडा, रावेर, निंभोरा, सावदा स्थानकांवरून भुसावळपर्यंत धावत आहे.
त्यामुळे भुसावळ अथवा जळगावची कामे आटोपून लागलीच परतीच्या प्रवासासाठी परत येणे दुरापास्त ठरत आहे. या एक्स्प्रेस गाडीने मध्य प्रदेश तसेच तालुक्यातील सर्वसामान्य प्रवाशांना भुसावळ येथून दुपारी नाशिक तसेच देवळाली मेमू प्रवासी गाड्यांची पूर्वीप्रमाणे संलग्नता जमत नसल्याने कमालीची गैरसोय होत आहे.