बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; पगार वाढीसह सुट्ट्यांबाबत झाला मोठा निर्णय..
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । देशातील लाखो बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक कर्मचारी संघटना यांच्यात चारही शनिवारी सुट्टी देण्याबाबत करार झाला आहे. म्हणजेच आता प्रत्येक रविवारप्रमाणेच प्रत्येक शनिवारीही बँकेला सुट्टी असणार आहे. एवढेच नाही तर पगारवाढीच्या मुद्द्यावरही एकमत झाल्याची चर्चा आहे. शासनाकडून अधिसूचना आल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन पगारवाढ 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
या निर्णयानुसार बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून केवळ 5 दिवस काम करावं लागणार आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने म्हटले आहे की सुट्टीच्या दिवसावर एकमत झाले आहे. मात्र सरकारी अधिसूचनेनंतरच सर्व निर्णय ग्राह्य धरले जातील. त्याचबरोबर 17 टक्के वार्षिक पगारवाढीचा करार झाला आहे. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर दरवर्षी सुमारे 8285 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. बँकांची संघटना आयबीए आणि बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर हा करार झाला आहे. त्याचवेळी, आयबीए संघटनांशी बोलल्यानंतर वार्षिक पगारात आणखी सुधारणा होऊ शकते.
आता महिला बँक कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय एक दिवसाची रजा घेता येईल, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, सेवानिवृत्तीनंतर आणि सेवेदरम्यान मृत्यू झाल्यानंतर 255 दिवसांपर्यंत पीएल कॅश केले जाऊ शकते.दरम्यान, या निर्णयामुळे सरकारी बँकांमधील सुमारे 8 लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पगार आणि आठवड्यातून एक दिवस अतिरिक्त रजेचा लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून त्यांचा पगार वाढणार असल्याने या कर्मचाऱ्यांनाही मोठी थकबाकी मिळण्याची अपेक्षा आहे.