जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२३ । मृत्यू हा प्रत्येकाला अटळ आहे. मात्र कोणाचा मृत्यू कधी आणि कसा होईल याचा नेम नाही. दरम्यान, जामनेर तालुक्यात एका विचित्र प्रकारामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असलेल्या मजुरांना डबा देऊन घरी परतत असताना तरुण शेतकऱ्याच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला. चावा घेतल्यानंतर मधमाशी घशात गेली अन् यात तरुणाचा मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका विचित्र होता की कोणाचाही यावर विश्वास बसत नाहीये.
ही घटना जामनेर तालुक्यातील पहूर नजीक असलेल्या लोंढ्री बुद्रूक या गावात घडलीय. अमजद खाँ अस्लम खाँ पठाण (वय २८, रा. लोंढ्री बुद्रूक ता.जामनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने लोंढ्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमका कसा घडला घात?
लोंढ्री बुद्रूक येथील रहिवासी अमजद खाँ अस्लम खाँ पठाण याचे शेंगोळे रस्त्यावर शेती आहे. सोमवारी त्याच्या शेतात मजूर कामावर आले होते, या मजुरांच्या जेवनाचे डबे घेऊन अमजद खाँ पठाण हे दुचाकीवरून शेतात गेले. मजुरांसोबत कामाविषयी बोलणं केलं. त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून घराकडे परतत असताना वाटेत अचानक अमजद खाँ पठाण यांच्या जीभेला मधमाशीने चावा घेतला. त्यानंतर ती मधमाशी घशात गेली. त्यामुळे त्याला वेदना होऊन श्वासोच्छवास घेण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यांना रुग्णालयात हलविले असता, प्राथमिक उपचार मिळेपर्यंत अमजद खाँ पठाण यांची प्राणज्योत मालवली होती.तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने लोंढ्री गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, पठाण यांची गावात मनमिळाऊ आणि कष्टकरी शेतकरी म्हणून गावात ओळख होती.
एका मधमाशीमुळे अशापध्दतीने दुर्घटना घडू शकते यावर नागरिकांचा विश्वास बसत नसणार. अमजद खाँ पठाण हे पहूर येथील अजमुद्दीन शेख यांचे जवाई आहेत. त्याच्या पश्चात दोन मुले, मुली, आई वडील आणि भाऊ असं कुटुंब आहे.
मात्र, प्रत्यक्षात अशी घटना घडल्याने मधमाशीला कुणी सहज घेवू नये, काही मधमाशीचा डंख हा विषारी असल्याने, ती चावल्यानंतर जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असा संदेश या घटनेतून शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी चर्चा सुरु आहे.