जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह राज्यातील २९ महानगर पालिका निवडणुकांचा निकाल लागून ४ दिवस झाले तरी देखील अद्याप महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली नाही. सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. अशातच असताना महापौरपदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदासाठीचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षणाची सोडत गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील परिषद सभागृहात पार पडणार असून, कार्यक्रमास सकाळी ११ वाजता प्रारंभ होणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, त्यासाठी नगर विकास विभागाने सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांमधील आगामी महापौर पदाच्या आरक्षणाबाबत स्पष्टता येण्यासाठी ही सोडत महत्त्वाची मानली जात आहे. महापौर पदाच्या आरक्षणाकडे राज्यातील राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांचे लक्ष लागून असून, सोडतीनंतर महापालिका राजकारणाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




