जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ११ मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हरीविठ्ठल नगर परिसरात निघालेल्या भव्य रॅलीत जनसागराचा ओघ पाहायला मिळाला.
प्रचाराच्या सुरुवातीला महायुतीच्या उमेदवारांनी स्थानिक प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि विजयाचा संकल्प करत रॅलीला सुरुवात केली. महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि मित्रपक्षांच्या उमेदवार डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे आणि संतोष पाटील यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान प्रभागात एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली.

डॉ. अमृता सोनवणे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार अरुणा सुहास कोळी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. इतकेच नव्हे तर, त्यांनी प्रत्यक्ष रॅलीत सहभागी होऊन महायुतीच्या प्रचारात सहभाग घेतला.

हरीविठ्ठल नगर हा लोकसंख्येने मोठा असलेला भाग असल्याने येथे रॅलीचे स्वागत अत्यंत उत्साहात करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी घराबाहेर येऊन उमेदवारांचे औक्षण केले आणि फुलांची उधळण केली. विशेषतः डॉ. अमृता सोनवणे यांनी घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी वृद्ध महिलांच्या तब्येतीची विचारपूस करत आणि तरुणांशी संवाद साधत मतदारांशी थेट नातं जोडलं. अनेक ठिकाणी महिलांनी त्यांना विजयाचा आशीर्वाद देऊन पेढे भरवले, ज्यामुळे रॅलीत एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते.




