जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । खरीप हंगाम जवळ येत असून बहुतांश शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे.सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. अशातच चालू हंगामासाठी जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीकनिहाय कर्जदर निश्चित केले आहेत.
त्यानुसार खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना केळी पिकासाठी हेक्टरी १,०४,५०० तर बागायत कपाशीसाठी ५०,६०० रुपये पीककर्ज मिळू शकणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पिके व फळपिकांच्या पीककर्जाच्या रकमेत सहा टक्क्यांनी वाढ केली आहे.नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने पीकनिहाय हेक्टरी कर्ज व पशुसंवर्धन तसेच मत्स्य व्यवसायासाठी कर्ज मर्यादा ठरवली आहे, त्याला जिल्हा बँकच्च्या संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.
बागायत कपाशी, ऊस, केळी व इतर बागायती पिकांसाठी पीक लागवडीचे प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी केल्यानंतरच कर्जवाटप करण्याच्या जिल्हा बँकेने सूचना दिलेल्या आहेत. ५० लाखोच्या वरील अनिष्ट तफावत असलेल्या संस्थांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना बैंक थेट अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा १ एप्रिलपासून करत आहे.
खरीप पीक कर्जासाठी संस्था पातळीवरील सभासदांची कर्ज परतफेड तारीख व बैंक पातळीवरील संस्थेची कर्ज परतफेड तारीख ३१ मार्च २०२५ अखेर राहील, जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या कर्जदारापेक्षा जास्त दराने शिफारस केल्यास, उचल दिल्यास अशा कर्जावर व्याज परतावा मिळणार नाही. कोरडवाहू खरीप पिकांसाठी पिक कर्ज वितरण करण्यासाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर ही आहे.
शिफारस केलेले पीककर्ज दर
कापूस कोरडवाहू ४४ हजार रुपये, केळी टिश्यू १ लाख ५४ हजार, मका बागायत ३७,५०० रुपये, खरीप ज्वारी बागायत ३००००, बाजरी बागायत २७५००, तूर बागायत ३५०००, मिरची व टोमॅटो ८१२५० रुपये, बटाटा १ लाख २५ हजार रुपये, कांदा खरीप ६८७५०, सोयाबीन ४५०००, मका कोरडवाहू ३२७५० रुपये, तूर कोरडवाहू ३९२५० रुपये, ज्वारी कोरडवाहू ३००००, उडीद व उडीद कोरडवाहू २५००० रुपये
मत्स्यसंवर्धनाला ९० हजार रुपये
कर्ज धोरणानुसार तलावातील मत्स्य संवर्धन प्रति हेक्टर प्रति वर्ष ९० हजार रुपये कर्ज मिळेल. जलाशयातील मत्स्य संवर्धनासाठी प्रति हेक्टर ३ लाख १५ हजार प्रती वर्ष मिळेल, कुक्कुटपालन करणारे शेतकरी व उत्पादकांसाठी ६८ हजार २५० रुपये प्रति दोन महिने एका बेंचसाठी तर वार्षिक चार बँचेससाठी मिळतील. दोन दुभत्या गायी व म्हशींसाठी १४ हजार ७०० रुपये प्रति दोन महिने याप्रमाणे कर्ज मिळेल.
बागायत हरभरासाठी ३३७५० रुपये:
रब्बी पिकांमध्ये गहू बागायत ३७५०० रुपये, हरभरा चागायत ३३७५० रुपये, रब्बी ज्वारी बागायती ३० हजार, ज्वारी कोरडवाहू ३० हजार, कांदा रब्बी ७५ हजार, डाळिंब फळबहार १ लाख २५ हजार, पेरू ६८ हजार ७५० रुपये, कागदी लिंबू ८१ हजार २५० रुपये, पपईसाठी ४३ हजार ७५० रुपये.