जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । जळगावातील कानसवाडा येथे माजी सरपंचाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना भुसावळातील सराईत गुंडाची क्रूर हत्या करून जमिनीत पुरल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. मुकेश प्रकाश भालेराव ( वय 31, रा. टेक्नीकल हायस्कूल मागे भुसावळ) असं खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

या घटनेबाबत असे की, मुकेश भालेराव याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, लुटमार, धमकी, खंडणी आदींचा समावेश होता. यावर प्रशासनाने त्याला नाशिक येथे स्थानबध्द देखील केले होते. यातून बाहेर आल्यानंतर तो भुसावळ येथेच वास्तव्याला होता. आठवड्यापूर्वी मुकेश भालेराव याला घरून काही तरूण घेऊन गेले होते. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेऊनदेखील तो मिळून न आल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी त्याची पत्नी पोलीस स्थानकात तक्रार देण्यासाठी आली.
दरम्यान, आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मुकेश प्रकाश भालेराव याचा खून करून त्याचा मृतदेह हा तापी नदीच्या बाजूला असलेल्या खोलवट भागात पुरून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्याचे काम सुरु होते. भुसावळ शहर पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुकेश भालेरावच्या खुनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या कृत्यामागे पुर्ववैमनस्य असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.