जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । अमळनेर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आलीय. येथील मुंबई गल्लीत 35 वर्षीय विवाहितेचा पतीने चारीत्र्याच्या संशयातून गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आलीय. आरोपीने सुरूवातीला पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला मात्र तपासात हा बनाव उघडा पडला. या घटनेने शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आज 9 सप्टेंबर रोजी पहाटे पती देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे घटना?
अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत राहणार देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी व त्याची पती योगीता चौधरी हे वास्तव्यास आहे. मुलबाळ नसल्याने दारूच्या आहारी गेला. देविदासकडून सातत्याने चारीत्र्यावर संशय घेवून छळ सुरू होता. यास कंटाळून पत्नी सुरत येथे नातेवाईकांकडे गेली होती मात्र पतीकडून होणार्या बदनामीला कंटाळून पुन्ही ती पतीकडे गैरसमज दूर करण्यासाठी आल्यानंतर गुरुवार, 8 रोजी आरोपीने पत्नीचा गळा आवळला मात्र प्रकरण अंगावर येईल म्हणून त्याने पत्नीने गळफास घेतल्याचा बनाव केला व ती गळफास घेताच खाली पडली, अशी खबर दिली.
भावाचा संशय ठरला खरा
मयत विवाहितेचा भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांना योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण दिसले तसेच गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा व नाकातून देखील रक्त येताना दिसल्याने संशय बळावला शिवाय छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही. योगीताचा खून झाल्याची खात्री दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने 9 रोजी पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.