जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । महाराष्ट्राच्या राजकारणामधील(Maharashtra Politics) एक मोठी बातमी आहे. ती म्हणजेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावलं आहे. दोघांना 14 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर छापून आणल्याच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. राहुल शेवाळे यांच्याविरोधात ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये काही मजकूर छापून आला होता. या मजकुरावर राहुल शेवाळे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या मजकुराविरोधात मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेत मानहानीचा दावा केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने घेतली आहे.
याप्रकरणी आज कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ठाकरे आणि राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी 14 जुलैला कोर्टात हजर राहावे, असा आदेश देण्यात आला आहे.