जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२४ । यंदा आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून कापसाचे उत्पादनही चांगले येईल. दरम्यान, नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरवात झाली असून नवीन कापसाला सुरुवातीला गेल्या वर्षीपेक्षा कमी दर मिळाला. २०२३ मधील कापसाला आठ हजारांचा दर मिळाला होता. तर यंदा नवीन कापूस असल्याने ७ हजार १५३ चा दर कापसाला मिळाला.
गेल्या वर्षी मान्सूनमध्ये पाऊस कमी झाल्याने कापूस उत्पादनात मोठी घट झाली. यातच बाजारात कापसाला चांगला भाव नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. सुरवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत दर कापसाला मिळाला होता. नंतर मात्र कापसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरूनच मागणी कमी झाल्याने कापसाचा दर सहा ते साडेसहा हजारांपर्यंत खाली आला होता.अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढेल या आशेने कापूस घरात साठवून ठेवला होता. ज्या शेतकऱ्याला गरज होती, त्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात कापूस विकला.
काहींनी गुजरातच्या व्यापाऱ्यांना कापूस विकला. यामुळे जिल्ह्यातील जीनिंग चालकांना पुरेसा कापूस मिळाला नाही. गेल्या वर्षी वास्तविक २२ लाख गाठी निमिर्तीचे टार्गेट जीनिंग उद्योजकांनी ठेवले होत. पण केवळ पंधरा लाख गाठींची निर्मिती झाली आहे.
दरम्यान, तरी यंदाच्या नवीन खरीप हंगामात कापसाचे उत्पादन अधिक होईल. यंदा कापसाला खुल्या बाजारात साधारणत: ७ हजारांचा दर राहील, असा अंदाज कापूस व्यापारी व्यक्त करीत आहेत. तसेच किमान पंचवीस लाख गाठींची निर्मिती होईल, असा अंदाज जीनिंग उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये ‘सीसीआय’ने कापूस खरेदी काही केंद्रावर सुरू केली असली तरी सात बाऱ्यावर नोंद, पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्डची अट, सोबतच पेमेंट मिळण्यास उशीर आदी कारणांनी काही शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते.