जळगाव लाईव्ह न्यूज । बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथील शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मक्याच्या पिकाला आग लागल्याची घटना (दि. १०) घडली. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ६ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आग लागून नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्याने केलीय.

याबाबत असं की, लोणवाडी येथील आकाश प्रभाकर चौधरी यांच्या शेतात वीजतारांच्या घर्षणाने ठिणगी पडून कापलेल्या मका पिकास आग लागली. या आगीत ६ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करण्यात आली आहे.
चार एकर क्षेत्रातील मका कापणी करण्यात आला होता. हा मका वाळलेला असल्यामुळे शार्ट सर्किटमुळे जोरात आग लागली. त्या आगीत शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाचा संच व पाइपलाइनही जळून खाक झाली आहे. शेतातून काम करून घरी असलेल्या शेतमालकाचा मुलगा आकाश प्रभाकर चौधरी यांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आरडाओरडा करून त्यांच्या मदतीने आग विझविण्याचा आटापिटा केला परंतु आग आटोक्यात आली नाही. सर्व माल जळून खाक झाला. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे आग लागून नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी चौधरी यांनी केली आहे.