⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | सहकार.. भाजप के बस की बात नहीं

सहकार.. भाजप के बस की बात नहीं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२१ । राज्यभरात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरु आहे. आजवर जिल्हा बँकेत पकड मजबूत करून असलेल्या राष्ट्रवादीलाच पुन्हा यश येईल असे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. केंद्राने सहकार खाते तयार करून त्याचा कार्यभार भाजपच्या हातात दिल्यानंतर राज्यातील भाजपला देखील तरतरी आणि सहकारात मजा वाटू लागली होती. परंतु गेल्या पंधरवड्यात घडलेल्या घडामोडी लक्षात घेता भाजपला सपशेल धोबी पछाड मिळाल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सध्याचे चित्र लक्षात घेता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून भाजपला धक्क्यांवर धक्के दिले जात आहे.

राज्यभरात जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकांची रणधुमाळी गेल्या महिनाभरापासून सुरु आहे. देशात केंद्र सरकारने सहकार खाते तयार करून त्याचा कारभार केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला. केंद्राने सहकार खाते तयार करताच राज्यातील भाजपला देखील जोर आला होता. राज्यातील बँकांचे आणि राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांचे आता काही खरे नाही अशा अफवा जोरात सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया देत भाजपची हवा फुस्स केली होती.

सहकार खात्याच्या निर्मितीनंतर राज्यातील सहकारी बँकांच्या निवडणुका पहिल्यांदाच होत आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुरुवातीला भाजप आणि महाआघाडी एकत्रित सर्वपक्षीय पॅनल तयार करणार असल्याची परिस्थिती होती. दोन वेळा नेत्यांच्या बैठका देखील झाल्या, सर्वांच्या समंतीने एकमत देखील झाले पण नंतर समजले की हि सर्व खेळी होती. भाजपला धक्का देत तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यानंतर भाजप खा.रक्षा खडसेंसह दिग्गजांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. जळगावात भाजपला पहिला धक्का सहन होत नाही तोच दुसरा धक्का बसला. जळगावच नव्हे तर राज्यात देखील भाजपला धक्का बसला आहे.

लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपच्या सर्वच उमेदवारांचे अर्ज बाद झाले. अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत देखील सहकार आणि परिवर्तन पॅनलमध्ये जोरदार लढत झाली तरी त्यातील बहुतांश सदस्य हे महाआघाडीशी संबंधित आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील चांगलीच चुरस आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सतेज पाटील यांच्याकडे एकही सत्ताकेंद्र नव्हते. पण त्यानंतर महापालिका निवडणुकीत २९ जागांवर विजय मिळवत सतेज पाटील यांनी जोरदार कमबॅक केला. दुसरीकडे सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रात सहभाग असलेले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक कुटुंबाला खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यासह गोकुळ दूध संघाच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचे बँकेचे चेअरमन, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे यंदा निवडणुकीत रंगत येणार हे मात्र निश्चित आहे.

राज्यात मनपा, नपा, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत भाजपला फोडाफोडीचा जुमला जमला असला तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र ते शक्य नसल्याचे दिसत आहे. आजवर सहकारात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला डाव प्रत्येकवेळी साधला आहे. सध्या होत असलेल्या जिल्हा बँकांच्या निवडणुकीत जर सर्वत्र भाजपचा पराभव झाला तर उद्या कदाचित ईडीचे अस्त्र वापरले जाईल अशी शंका व्यक्त होत आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.