जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२४ । लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून अशात चाळीसगाव तालुक्यातील वाघळी बीट हवालदारासह त्याच्या पंटरला दोन हजारांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. जयेश रामराव पवार (वय ५०, रा. गायकेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) असं लाचखोर हवालदाराने नाव असून सुनील श्रावण पवार (वय ५२) असं पंटरचे नाव आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मौजे तरवाडे येथील तक्रारदाराचा गावातील एकाशी वाद झाला होता. समोरच्या व्यक्तीने तक्रारदाराविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबरला गुन्हा दाखल केला होता. नंतर वाघळी बीटचे हवलदार जयेश रामराव पवार (वय ५०, रा. गायकेनगर, हिरापूर रोड, चाळीसगाव) यांनी तक्रारदाराला त्याच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाईमध्ये सहकार्य करण्याच्या मोबदल्यात तसेच त्रास न होऊ देण्यासाठी त्यांच्याकडे चार हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
सदर पथकाने १२ नोव्हेंबरला चाळीसगाव येथे सापळा रचला. हवालदार जयेश पवार यांनी तक्रारदाराकडे पंचासमक्ष ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता दोन हजार रुपये त्यांनी खासगी सुनील श्रावण पवार (वय ५२) यांच्या हस्ते स्वीकारताना त्यांना पकडले. संशयित जयेश पवार व सुनील पवार यांना ताब्यात घेतले आहे.