⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | Connecting Dots : हिंदुत्व, धर्मवीर, दिघे साहेब, बंडखोरी व्हाया भाजपेयी मनसे

Connecting Dots : हिंदुत्व, धर्मवीर, दिघे साहेब, बंडखोरी व्हाया भाजपेयी मनसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राजकारणात केव्हा काय होईल याचा काही नेम नसतो असे म्हटले जाते. परंतु, अलीकडच्या काळात राजकारण प्रचंड बदलले असून भविष्याचा विचार करीत भूतकाळाचा अनुभव लक्षात घेऊन वर्तमानमध्ये नियोजन केले जाते. राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडींचे भूतकाळातील काही पैलू जोडण्याचा प्रयत्न केल्यास आजचे शिवसेनेतील बंड भूतकाळात शिजलेले राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो. शिवसेनेतून आज एक, दोन नव्हे तर तब्बल ९ मंत्र्यांसह ३९ आमदार बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. इतकंच नव्हे तर त्यांना अपक्षांची देखील साथ आहे. एकाएकी इतका मोठा डाव एकट्याने साधणे शक्य नाही हे साऱ्या गावाला माहिती आहे. सत्ता स्थापनेसाठी खेळण्यात आलेली खेळी कितपत यशस्वी होईल हे तूर्तास सांगणे अवघड असले तरी या सत्ता नाट्यामागे भाजपचा मनसे मागून हात आहे हे नक्कीच म्हणावे लागेल.

प्रेम, युद्ध आणि राजकारणात वैर साहजिकच असल्याचे म्हटले जाते. प्रेम आणि युद्धातील वैर बऱ्याच काळ टिकत असले तरी राजकारणात मात्र आजचा शत्रू उद्याचा मित्र असतो. कोण, केव्हा, कुणाला जाऊन सामील होईल याची कल्पना देखील करता येत नाही. महाराष्ट्रातील राजकारण गेल्या सात दिवसापासून फार ढवळून निघाले आहे. मुळात आठ दिवस म्हणण्यापेक्षा राज्यसभा निवडणुकीपासूनच प्रचंड अस्थिर असल्याचे दिसते. महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय संपादित करून सत्ता स्थापन केली होती. राज्यात मोदी सरकारचा करिष्मा कायम असल्याने २०१९ मध्ये देखील भाजपला चांगले यश मिळाले. भाजप आणि सेनेची युती होऊन सरकार स्थापन होणार असे चित्र स्पष्ट असताना कुठेतरी माशी शिंकली आणि मविआ सरकार स्थापन होऊन भाजप विरोधात बसली.

विरोधात असलेल्या भाजपने नेहमी मविआ सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. केंद्रात भाजपची सत्ता असून येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये देखील लोकसभेत आपलाच बोलबाला असावा यासाठी भाजपाला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणे आवश्यक आहे. साम, दाम, दंड, भेद कोणत्याही तत्वाचा उपयोग करावा लागला तरी चालेल पण सत्ता हवीच अशी भाजपची भुमिका होती. देशात हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन वावरणाऱ्या दोन प्रमुख पक्षांमध्ये राष्ट्रीय स्तरावर भाजप तर राज्यात शिवसेनेचेच नाव घेतले जाते. देशात केवळ आपणच आणि देशभर भाजपचं राहण्यासाठी भाजपने पिंड बांधले. राज्यातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने केंद्रातील यंत्रणांचा पुरेपूर उपयोग केला. राज्य सरकारला मात्र ते जमले नाही. ईडी, सीबीआय चौकश्या सुरु झाल्या. आरोपांच्या फैरीत काही नेते गारद झाले.

भाजप सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेला टार्गेट करीत आहे. सेनेला शह देण्यासाठी भाजपने राणे पिता पुत्रांना पुढे केले. दोघांनी जोरदार बॅटिंग करीत सेनेला जेरीस आणले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना काळात मंत्री, आमदार, जनतेच्या फारसे थेट संपर्कात नसल्याने त्यांची एक वेगळी प्रतिमा राज्यात तयार करण्यात आली. भाजपने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. सर्व काळात भाजपने सेनेचा एक म्होरक्या गळाला लावला तो म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. आजवर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या बाजूने नेहमी सॉफ्ट कॉर्नर ठेवला होता. भाजपविरुद्ध कधीही आक्रमक भूमिका मांडताना एकनाथ शिंदे दिसून आले नाही. शिवसेनेकडून नेहमी खा.संजय राऊत आणि आ.गुलाबराव पाटील हेच फ्रंटवर होते.

एकीकडे भाजप एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे आमदार गळाला लावण्याच्या प्रयत्नात होती तर दुसरीकडे मनसेला देखील त्यांनी वाढवायला सुरुवात केली. शिवसेनेला राज्यासोबतच मुंबई जास्त महत्वाची होती. मुंबई शिवसेनेचा गड होता आणि आता मुंबईच्या निवडणूक येऊन ठेपल्या आहेत. मुंबईत भाजपला शिवसेना वरचढ होणार हे निश्चित असले तरी मनसे मात्र काटे कि टक्कर देणार हे स्पष्ट दिसत होते. साधारणतः वर्षभरापूर्वी एकनाथ खडसेंच्या मागे ईडी चौकशी लावल्यावर सुरु झालेली हि खेळी हळूहळू बहरू लागली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटे खेळलेली खेळी अयशस्वी झाल्यावर फसलेला डाव आणि पक्षाचे झालेले हसू लक्षात घेऊन पुढील डाव खेळताना चुकांची पुनरावृत्ती नको म्हणून सावध पाऊले टाकण्यात आली.

आजवर नगरविकास खाते प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतःजवळ ठेवले होते मात्र ठाकरे सरकारने नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले. राजकारणातील जेष्ठ नेते असल्याने आपल्या खात्याचा कसा प्रभावी उपयोग करून घेता येईल याचे नियोजनच शिंदे यांनी केले असावे. राज्यातून जाणारा पण भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग, नगरविकासच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी डीपीडीसी समृद्ध केल्या त्यात प्रत्येक आमदाराला बोलावून ‘मी’ निधी देत असल्याची जाणीव करून दिली. जळगाव मनपात भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेची सत्ता प्रस्थापित केली आणि स्वतःची सरशी करून घेतली. विविध सामाजिक संस्था, महापालिकांना भरभरून निधी दिला. स्वतःच्या मुलाला खासदार करीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्याच नावाचा डंका कसा वाजणार याची एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेतली.
हे देखील वाचा : राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपचा फॉर्म्युला तयार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे नाव फायनल?

आजवरचा शिवसेनेचा इतिहास लक्षात घेता स्व.आनंद दिघे यांचा पुढील राजकीय वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले जात होते. ज्याप्रमाणे शिवसेनेत स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व.आनंद दिघे यांचे नाव होते तशीच प्रतिमा आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तर प्रति मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची तयार झाली आहे. आपल्या नावाचे वलय आणखी वाढविण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला तो ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट. प्रसाद ओक याने स्व.दिघे यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी पूर्ण चित्रपटात भाव खाऊन गेले ते एकनाथ शिंदे यांचे पात्र. एकनाथ शिंदे स्व.दिघे यांच्या किती जवळचे होते आणि आजही ते स्व.दिघे यांचा वारसा कसा पद्धतशीरपणे पुढे चालवत आहेत ते धर्मवीरमध्ये अगदी व्यवस्थितपणे मांडण्यात आले आहे. धर्मवीरमध्ये एकनाथ शिंदे यांना जितके महत्व दिले गेले त्या तुलनेत स्व.बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसून आले नाही.

धर्मवीरमध्ये दाखविण्यात आलेल्या शेवटच्या एका सीनमध्ये आनंद दिघे हे रुग्णालयात उपचार घेत असताना राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी येतात. तब्येतीची विचारपूस केल्यावर राज ठाकरे यांना उद्देशून ‘हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमच्या हाती आहे’ असे स्व.दिघे म्हणतात. सिनेमागृहातून धर्मवीर ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला असता त्यात तेच वाक्य वगळण्यात आले आहे. चित्रपटात अवघ्या काही सेकंदांसाठी उद्धव ठाकरे यांचे पात्र दाखविण्यात आले आहे त्या तुलनेत राज ठाकरे बराच वेळ आहे. स्व.आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत तेव्हापासून आजही संशय कायम असून मृत्यू झाला कि घडवला अशा शंका उपस्थित केल्या जातात. धर्मवीरमध्ये देखील चित्रपट संपताना शेवटच्या क्षणी एक पत्रकार स्व.आनंद दिघे यांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित करताना दाखविण्यात आला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तेव्हापासून असलेल्या शंकेला आणखीन वाव देण्यात आला असे म्हणायला हरकत नाही.

एकीकडे भाजपचे गुप्त षडयंत्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु असताना भाजपने आणि मनसेने पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला. आजवर हिंदुत्वाचा भाषा न करणाऱ्या मनसेने अचानक भोंग्यांचा विषय काढल्याने सर्वच अवाक झाले. राज ठाकरे यांनी पद्धतशीर मुद्दे मांडत आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणांचा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आधार भोंग्याच्या माध्यमातून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला. भोंगा आणि हनुमान चालीसा हे दोन मुद्दे अचानक चर्चेत आले. भाजपकडून अनपेक्षितपणे राणा दाम्पत्याने त्यात उडी घेतली आणि थेट उद्धव ठाकरे व शिवसेनेलाच आव्हान दिले. शिवसेना हिंदुत्वविरोधी तर मनसे आणि भाजप हिंदुत्ववादी असल्याचे चित्र उभे राहिले. धर्मवीर चित्रपटात देखील राज ठाकरे यांना स्व.आनंद दिघे यांनी हिंदुत्वाची जबाबदारी सोपवली हा निव्वळ योगायोग असावा असे नसेलच.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : भाजपचे ठरले, प्लॅन बी देखील तयार, रविवारी स्थापन करणार सरकार!

शिवसेना आणि मविआविरुद्ध खेळली गेलेली खेळी यशस्वी होत असल्याचा प्रत्यय राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत आला. भाजपाकडे सत्ता आणि पुरेसे संख्याबळ नसताना देखील दोन्ही निवडणुकीत त्यांनी अधिकची एक जागा जिंकली आणि मविआला धक्का दिला. आपला डाव यशस्वी होत असल्यानेच विधान परिषद निवडणूक आटोपताच रातोरात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन परराज्यात आणि योगायोगाने भाजपशासित गुजरातमध्ये जाऊन पोहचले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री आणि आमदार फोडताना मांडलेले काही मुद्दे खरोखरच हास्यास्पद आणि संशयास्पद आहेत. पहिल्याच दिवशी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला, दुसऱ्या दिवशी मविआतून बाहेर पडण्याची मागणी, मंत्री टक्केवारी मागत असल्याचा आरोप, मुख्यमंत्री दाद देत नसल्याचा उल्लेख असे काही मुद्दे मांडण्यात आले. सर्वात शेवटी समोर आलेला मुद्दा म्हणजे भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करावे.

एकनाथ शिंदे गेल्या ८ दिवसापासून ९ मंत्र्यांसह जवळपास ५० आमदारांना घेऊन अहमदाबाद, सुरत, गुवाहाटी असा प्रवास करून एका प्रशस्त हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आमदारांना आणण्यासाठी २ चार्टर आणि १ मोठे विमान, भाजपशासित राज्यातील हॉटेलमध्ये मुक्काम. हॉटेलमधील मुक्काम, खाण्यापिण्याचा खर्च, आमदारांची ये-जा हा सर्व खर्च करोडोंमध्ये असून एकटे एकनाथ शिंदे हे कसे करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांना कुणाचा आधार असल्याशिवाय हे शक्यच नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेसाठी दिलेल्या निमंत्रणाला न जाणे, मुख्यमंत्री पदाची ऑफर न स्विकारणे, दोन तृतीयांश आमदारसोबत ठेवणे हे सर्व मायक्रो नियोजन आणि मोठे फंडिंग असल्याशिवाय शक्यच नाही. एकनाथ शिंदे गट, भाजपा, मनसे किंवा इतर कुणी हे चित्र लवकरच स्पष्ट होणार असले तरी सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेले डॉट्स (शंकेचे वलय) काही जोडले जात नाही हे मात्र खरे आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.