जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होउन त्यात चार ते पाच जणांना मंत्रिपदाची शपथ देऊन महा विकास आघाडी रिक्त जागा भरून काढण्यात येणार आहे. यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी एक तर काँग्रेसतर्फे दोघांना बदलून नव्यांना संधी देण्याची शक्यता आता वाढली आहे.
यामध्ये आजोबांपासून काँग्रेसमध्ये निष्ठावान असलेले व यावल-रावेर मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. यासोबत जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करून स्वबळावर जिल्ह्यातील अनेक जागा निवडून आणण्याचा मानस देखील पक्षश्रेष्ठींचा दिसून येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्वबळावर लढणार अशी माहिती काल दिली. त्याचबरोबर महाविकास आघाडी मध्ये चार नवीन आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार असल्याचेही आता संकेत मिळाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे संजय राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या दोन मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन दोघांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगितले जात आहे. यामध्ये मुंबईचे पालकमंत्री व मत्स्य विकास मंत्री असलम शेख तसेच नंदुरबार जिल्ह्यातील आणि आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचे मंत्रिपद काढून इतर नवीन दोघांना संधी देणार असल्याबाबत पक्ष सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
नवीन कोणत्या आमदारांना संधी द्यावी याबाबत काँग्रेस पक्षामध्ये चाचपणी सुरू झालेली आहे. यात बाळासाहेब चौधरी यांची पुण्याई असलेले व आयुष्यभर काँग्रेसची सेवा केली असल्यामुळे बाळासाहेबांचे सुपुत्र तथा यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष दादा चौधरी यांचे नाव अग्रगण्य म्हणून घेतले जात आहे. शिरीष दादा चौधरी यांना संधी देऊन जळगाव जिल्ह्यात काँग्रेसची झालेली पीछेहाट रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल असे चित्र आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश मिळण्यासाठी शिरीष दादांना बळ देऊन काँग्रेस स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करेल असे बोलले जात आहे. शिरीषदादा चौधरी यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास जिल्ह्यात दुसरे मंत्रीपद मिळणार आहे. शिरीषदादा चौधरी यांना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद मिळते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
शिरिषदादा चौधरी यांच्यासोबत परभणी जिल्ह्यातील पाथरी मतदारसंघाचे सुरेश वरपुडकर, मुंबादेवी मतदार संघाचे अमीन पटेल यांचे नाव घेतले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार आहेत. त्यात ऋतुराज पाटील, पी. एन. पाटील, राजू आवळे यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तसेच तरुण रक्ताला संधी द्यायची असे ठरले तर सुशीलकुमार शिंदे यांच्या सुपुत्री सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे आणि ऋतुराज पाटील यांचा विचार होऊ शकतो. यासह खान्देशातून शिरीष नाईक, धुळ्याचे कुणाल पाटील यांचाही विचार केला जाऊ शकतो. दरम्यान मंत्रिपदाच्या आशेमुळे अनेक आमदारांच्या पक्षश्रेष्ठींकडे मुंबई वारी सुरू झालेले आहेत.