जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नेहमीच चांगले काम करीत असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येतोय. एकटा माणूस कोरोनापासून बचावासाठी खिंड लढवतो आहे, इतर अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात एका महिलेला बेड मिळत नसताना मध्यरात्री जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या एका पत्रकाराला स्वतः फोन लावून महिलेची व्यवस्था डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात करून दिली.
काल सकाळी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या पंडित निकुंभ-शिंपी कोविड रुग्णाच्या नातेवाईकांचा फोन आला. ७२ वर्षीय रुग्णाचा HRCT स्कोर १६ आला होता. रुग्णाला रेमेडीसीवर देणे आवश्यक होते पण पाचोरा ग्रामीण रुग्णालयात ते मिळत नव्हते आणि जिल्हा रुग्णालयात ते पडून होते. वार्ताहराकडून रुग्णालय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांचा क्रमांक मिळाला, दिवसभर त्यांचा फोन सतत व्यस्त येत होता. पाचोऱ्याचे कार्यतत्पर आमदार किशोर आप्पा पाटील यांचे दोन्ही क्रमांक नॉट रीचेबल, त्यांचे स्वीय सहाय्यक ब्राह्मणे यांनी डॉ.साळुंखे यांचा नंबर व्हाट्सअँप केला मात्र फोन घेतले नाही.
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय अधीक्षक डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे विषय असल्याचे कळविले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्याशी दोन वेळा संपर्क केला परंतु त्यांनीही फोन घेतला नाही. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी कागदपत्रे व्हाट्सअँपला मागवली पण पुढे काय झाले याची माहिती नाही, त्यांनी तसे कळविले देखील नाही.
रुग्णाची माहिती, कागदपत्रे आणि नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मी वरील सर्वांना व्हाट्सअँप केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मेसेज पाहून यंत्रणा कामाला लावली पण रुग्णाची नोंद शिंपी आडनावाने असल्याने अडचण आली. नातेवाईकांनी निकुंभ आडनाव पाठविले होते. सायंकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी आडनावाच्या चुकीबाबत कळविले. पुन्हा माहिती घेऊन अवघ्या दीड तासात रेमेडीसीवर रुग्णाला मिळाले. रुग्णालय अधिक्षकांनी स्वतः रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून तसे कळविले. रुग्ण जरी जीवाची खिंड लढवीत असला तरी रुग्णाच्या नातेवाईकांच्या जीवात जीव आला.
अर्धा डझन लोक प्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर देखील जे काम होऊ शकले नाही ते काम जिल्ह्याच्या प्रथम अधिकाऱ्याला करावे लागले. नेहमी कार्यतत्पर आणि प्रसिद्धीपासून लांब असलेल्या जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आभार मानावे ते कमीच..! रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि मी त्यांना मेसेज करून आभार व्यक्त केले. जिल्ह्याला असा भला माणूस मिळाला हे आपलं भाग्यच आहे. जुना इतिहास तपासला तर कोविड आणि इतर काळात कोणत्या जिल्हाधिकाऱ्याने किती आणि कसे काम केले हे सर्वांना ठाऊकच आहे.
– चेतन वाणी, जळगाव
मो. 9823333119