जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२५ । अवकाळी पावसाने उघडीप घेतल्यानंतर आता जळगाव शहरासह जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली असून एकाच दिवसात रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंतची घसरण दिसून अली. यामुळे रात्री आणि आज पहाटे थंडीची तीव्रता अधिक जाणवली. वातावरणात सध्या निरभ्र आकाश आणि शांतता जाणवत आहे, ज्यामुळे थंडीचा कडाका वाढणार असून यातच आगामी काळात तापमानात आणखी मोठी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मागचे दोन आठवडे धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाची परिस्थिती आता पूर्णपणे संपल्यामुळे, जिल्ह्यात कोरडे वातावरण निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम म्हणून उत्तरेकडून येणारे थंड वारे पुन्हा सक्रिय झाले आहे. यामुळे जळगावकरांना आता थंडीचा कडाका जाणवू लागला आहे

जळगाव शहरासह जिल्ह्यातील पारा हळूहळू घसरताना दिसत असून दोन दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी जळगावचे रात्रीचे तापमान २१ अंश इतके होते. मात्र, केवळ एकाच दिवसात हे तापमान तब्बल चार अंशांनी खाली येऊन गुरुवारी तापमान १७ अंशांपर्यंत घसरले होते.

गेल्या दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी जाणवत नव्हती. मात्र, आता उत्तरेकडील जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे, थंड वाऱ्याचा मोठा प्रवाह थेट जळगाव जिल्ह्याकडे येण्याची शक्यता आहे. जर राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले नाही, तर यंदा जिल्ह्यात थंडीचा कडाका अधिक राहण्याची शक्यता असून, जळगावकरांना रेकॉर्डब्रेक थंडीचा सामना करावा लागू शकतो. आगामी काळात तापमानात आणखी मोठी घट होण्याचा अंदाज असून यामुळे थंडीचा जोर वाढू शकतो.
पुढील पाच दिवसांचा रात्रीच्या तापमानाचा अंदाज
तारीख आणि रात्रीचे तापमान
७ नोव्हेंबर : १७ अंश
८ नोव्हेंबर : १६ अंश
९ नोव्हेंबर : १६ अंश
१० नोव्हेंबर : १७ अंश
११ नोव्हेंबर : १६ अंश.





